आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइन लावायचा त्रास नको, ऑनलाइन खरेदीचा कल वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतामध्ये ऑनलाइन खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे यंदाच्या उत्सव काळात प्रामुख्याने दिसून आले आहे. सुरक्षेची काळजी, मोठय़ा प्रमाणावर सूट, अनेक पर्याय आणि इंधनाचे वाढते दर ही सर्व त्यामागची प्रमुख कारणे ठरली आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन खरेदीचे प्रमाण 250 पटींनी वाढले आहे.

असोचेमतर्फे नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात बाजारातील गर्दीपासून दूर घरी बसून खरेदी करण्याबरोबरच इतर अनेक फायद्यांचा विचार करता ग्राहक याकडे वळले असल्याचे निदर्शनास आले. प्रामुख्याने यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन खरेदी झाली असल्याचे असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी सांगितले. इंधनाचे वाढलेले दर, घरबसल्या उपलब्ध होणारे अनेक पर्याय आणि मोठय़ा शहरांत सुरक्षेची चिंता ही त्यामागची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले. असोचेमने दिल्ली, लखनऊ, कोलकाता, चंदिगड, डेहराडून, पुणे, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, कोचीन, चेन्नई, उदयपूर आणि जयपूर अशा शहरांत हे सर्वेक्षण केले.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 58 टक्के खरेदी दिवाळीच्या भेटवस्तूंची झाली आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स 41 टक्के, कपडे 36 टक्के, कॉम्प्युटर व संबंधित साहित्य 33 टक्के, घर सजावटीच्या वस्तू 20 टक्के, घरगुती वापराच्या वस्तू 16 टक्के, दागिने 15 टक्के, सौंदर्य प्रसाधने 12 टक्के अशा वस्तूंची विक्री झाली.

ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढल्याने सर्व शहरांतील दुकानदारांच्या व्यवसायावरही मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत 5 हजार कोटींचा ऑनलाइन खरेदीचा व्यवसाय झाल्याचा दावाही सर्वेक्षणात करण्यात आला आहे. घरबसल्या 24 तास शॉपिंग हा ऑनलाइन खरेदीचा सर्वात मोठा फायदा आहे. ऑर्डर केल्यानंतर आपल्या पत्त्यावर पाहिजे ते उत्पादन मिळण्याचा फायदा आहे. दिल्लीचे लोक ऑनलाइन खरेदीत आघाडीवर असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. दिल्लीत एकूण लोकसंख्येपैकी 71 टक्के लोक ऑनलाइन खरेदी करतात, तर 21 टक्के लोकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी पारंपरिक पद्धतीने खरेदी करत असल्याचे सांगितले. मुंबईत 55 टक्के लोक ऑनलाइन खरेदीचा आनंद घेतात.