आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्लॅट किंवा रो हाऊसचे बुकिंग करताना बिल्डर त्याचा ताबा देण्यासाठी विशिष्ट डेडलाइन देतात. अनेक ठिकाणीही डेडलाइन पाळली जात नाही. अशावेळी ग्राहकांसमोर काय पर्याय असू शकतात?
शांतीनाथ पाटील वैतागले होते. रागामुळे ते घामाघूम झाले होते. कारणही तसेच होते. दोन वर्षांपूर्वी मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे गुंतवून त्यांनी फ्लॅट घेण्याचे स्वप्न पाहिले, पण बिल्डरने दाखवलेल्या इमारतीचे अजूनही बांधकाम सुरू होते. ते कधी पूर्ण होईल याची कल्पना नव्हती. पाटील यांनी फ्लॅट संदर्भात बिल्डराच्या संबंधित अधिका-याला विचारले असता त्याने टोलवाटोलवी केल्याने ते वैतागले होते.
अनेकांचा असा अनुभव
शांतीनाथ सारखा अनुभव अनेकांना येतो.वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळण्याचा प्रश्न भयावह होत आहे.आपल्या घरात राहण्याचे स्वप्न पाहणारे अनेकजण बिल्डर ऑफिसच्या चकरा मारून त्रस्त झाले आहेत. फ्लॅट देण्याची तारीख उलटून वर्षे झाले आहे तरी बिल्डर फ्लॅटचा ताबा देत नाही. दंडाची तरतूद असताना सुद्धा बिल्डर याला गांभीर्याने घेत नसल्याची तक्रार शांतीनाथ यांनी केली. त्यांचा बिल्डर फ्लॅट किंवा दंड देण्याच्या तयारीत नाही.
काय आहेत पर्याय ?
रिअल इस्टेट विषयाचे तज्ज्ञ आणि प्रसिद्ध वकील एस. के. गंभीर सांगतात की, फ्लॅटचा ताबा देण्यात विलंब होत असल्यास बिल्डराने ग्राहकांकडून घेतलेली रक्कम सहव्याज परत करावी, अशी तरतूद आहे. ग्राहक सुरक्षा कायद्यानुसार बिल्डरवर कारवाई होऊ शकते. फ्लॅट देण्यास टाळाटाळ करणा-या बिल्डरवर कारवाई करण्याचा कायदा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात लागू आहे. जमीन, घर हे राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारे विषय असल्याने याबाबत केंद्राचा कोणताच कायदा नाही.
तक्रार दाखल करावी
बिल्डरकडून फ्लॅट देण्यास विलंब किंवा टाळाटाळ होत असल्यास ग्राहकाने ग्राहक न्यायालयात जाऊन तक्रार दाखल केली पाहिजे, असा सल्ला देतात. येथे ग्राहकाला न्याय मिळू शकतो, पण न्यायालयात दाखल होणा-या तक्रारीचे प्रमाण पाहता येथे लवकर निकाल लागण्याची शक्यता कमी असते.
कारवाई होणे गरजेचे
जे बिल्डर किंवा कंपन्या ग्राहकांच्या हिताशी खेळतात त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत दिल्ली येथील प्रमुख रिअल इस्टेट कंपनी आयएलडी ग्रुपचे सीईओ राजीव चोप्रा यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे बिल्डरच्या अडचणीकडे सुद्धा ग्राहकांनी लक्ष दिले पाहिजे. काही तांत्रिक कारणामुळे फ्लॅटच्या निर्मितीत विलंब होऊ शकतो याची जाणीव देखील ग्राहकांनी ठेवली पाहिजे असे चोप्रा म्हणतात, पण किती विलंब व्हावा याला सुद्धा काही मर्यादा असतात. अतिविलंबामुळे ग्राहक त्रस्त होतात. बँकांचे व्याज भरत असल्याने त्यांना मनस्ताप होत असतो हे देखील खरे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.