आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या बँकेच्या एटीएमचा वापर ठरणार महागडा, वाढीव शुल्क लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - दुस-या बँकेच्या एटीएमचा वापर करून पैसे काढणे 15 जानेवारीपासून महागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंगळुरू येथे एटीएम केबिनमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार आणि पोलिसांकडून एटीएमची सुरक्षा वाढवण्याचा दबाव वाढला आहे. तिकडे सुरक्षा वाढवण्यामुळे झालेल्या खर्चवाढीचा भार ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याचा बँकांचा विचार आहे. या संदर्भातील शुल्क निश्चितीसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) 15 जानेवारी रोजी सर्व बँकांची बैठक बोलावली आहे. त्यात एका बँकेच्या कार्डचा वापर दुस-या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी केल्यास त्यावरील शुल्कवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे सुरक्षा व्यवस्थेवरील वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्याची योजना आहे. सध्या दुस-या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते. समजा पैसे निघाले नाहीत तरी पाचनंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी नऊ रुपये शुल्क आकारले जाते. त्यासाठी त्या एटीएममधून महिन्याकाठी दहा हजारांखाली ट्रांझेक्शन असणे आवश्यक आहे.
एनपीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक अशा खासगी बँका अशा प्रकारे शुल्कवाढीस राजी आहेत. या सर्व बँकांचे प्रत्येकी 10 हजार एटीएम आहेत.
या बँकांच्या एटीएमवर इतर बँकांच्या ग्राहकांचे जाण्याचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे देशभरात 40 हजार एटीएम आहेत. असे असले तरीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे बहुतेक ग्राहक इतर एटीएमचा वापर करतात. एखाद्या एटीएमवर किती प्रमाणात व्यवहार होतात हे त्याच्या लोकेशनवर अवलंबून असते. कोटक तसेच अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी आहेत, जेथे महिन्याकाठी 500 हून जास्त व्यवहार होतात. दुसरीकडे, सार्वजनिक बँकांचे एटीएम त्यांच्या शाखांजवळ जास्त आहेत, जेथे कमी प्रमाणात त्याचा वापर होतो.
* 40 हजार एटीएम आहेत एसबीआयचे देशभरात
*10000 च्या आसपास आहेत चार खासगी बँकांचे एटीएम देशभरात
* 20 रुपये शुल्क लागते इतर बँकांच्या एटीएममधून पाचपेक्षा जास्त वापरासाठी
14 बँकांची सहमती हवी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जानेवारी रोजी होणा-या बैठकीत ज्या बँकांचे ग्राहक दुस-या बँकांच्या एटीएममधून जास्त प्रमाणात व्यवहार करतात अशा 14 बँका भाग घेणार आहेत. या सर्व बँकांनी एकत्र येऊन त्यांचे नॅशनल फायनान्स स्विस बनवले आहे. त्यामुळे एटीएम संदर्भातील शुल्कवाढीसाठी त्यांच्यात एकमत असणे गरजेचे आहे. सुरक्षा व्यवस्थेचा वाढीव खर्च ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय होऊ शकतो.