आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Notes Investment Hits Nearly 3 Year High At $34

पी-नोट्स गुंतवणुकीचा उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशातील अतिश्रीमंत आणि हेज फंडांची शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ‘पार्टिसिपेटरी नोट्स’ अर्थात ‘पी-नोट्स’ हा सर्वात पसंतीचा मार्ग आहे. त्यामुळे पी-नोट्सच्या माध्यमातून मार्च महिन्यात 2.07 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय समभागांमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांतील ही गुंतवणुकीची सर्वोच्च पातळी आहे.

भांडवल बाजार नियंत्रक सेबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील शेअर बाजारात (समभाग, कर्ज, डेरिव्हेटिव्हज) पी- नोट गुंतवणुकीत लक्षणीय वाढ होऊन ती फेब्रुवारी महिन्यातील 1,72,738 कोटी रुपयांवरून 2,07,639 कोटी रुपयांवर गेली आहे. याअगोदर मे 2011 मध्ये 2,11,199 कोटी रुपयांची सर्वाधिक गुंतवणूक पी-नोट्सच्या माध्यमातून झाली आहे.

काही वर्षांपूर्वी एकूण विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये पी-नोट्सचा वापर करण्याचे प्रमाण जवळपास 50 टक्के होते. परंतु सेबीने डिस्क्लोजर तसेच गुंतवणुकीशी निगडित अन्य काही नियम कडक केल्यामुळे पी-नोट्स गुंतवणुकीचे प्रमाण घटले. 2007 मध्ये भांडवल बाजारात आलेल्या तेजीमधील काही महिन्यांमध्ये हे प्रमाण जवळपास 50 टक्क्यांच्या वर गेले होते. गेल्या तीन वर्षातील पी-नोट्सच्या माध्यमातून होणार्‍या गुंतवणुकीची सर्वोच्च पातळी आहे.

पी-नोट्सधारक कराच्या जाळ्यात ?
विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून देण्यात आलेल्या पार्टिसिपेटरी नोट्सवर सध्या कोणत्याही प्रकारे कर आकारला जात नाही; परंतु आगामी अर्थसंकल्पात पार्टिसिपेटरी नोट्सधारकांना नव्या कराचा भार सहन करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत वित्त मंत्रालय अनुकूल असल्याचे वित्त मंत्रालयाचे सल्लागार पार्थसारथी शोम यांनी अलीकडेच संकेत दिले होते.

पी- नोट्स म्हणजे काय
विदेशातील अतिश्रीमंत व्यक्ती, हेज फंड आणि अन्य विदेशी संस्था प्रामुख्याने पी-नोट्सचा वापर करतात. नोंदणीकृत विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या माध्यमातून भारतीय समभाग बाजारपेठेत गुंतवणूक करण्याची त्यांना परवानगी असते. त्यामुळे थेट नोंदणीशी निगडित खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते.

गुंतवणूक वाढीची कारणे
- लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात स्थिर सरकार येण्याची आशा
- डॉलरच्या तुलनेत सशक्त झालेला रुपया
- पी-नोट्स गुंतवणूक मार्चअखेर : डेरिव्हेटिव्हज : 1.36 लाख कोटी रु.