इतिहासात पहिल्यांदा पॅन / इतिहासात पहिल्यांदा पॅन नसणार्‍या श्रीमंत उमेदवारांवर करडी नजर

Apr 04,2014 01:45:00 AM IST

नवी दिल्ली- ज्या उमेदवारांकडे पाच कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे, मात्र पॅन कार्ड नाही अशा उमेदवारांवर प्राप्तिकर विभागाबरोबरच निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. कर विभाग आणि निवडणूक आयोगाने रेड फ्लॅग्जची यादी तयार केली आहे. यामुळे कर चोरांना निवडणुकीच्या आखाड्यातून बाहेर काढता येईल.

सध्या देशात लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी उडाली आहे. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांनी सादर केलेल्या विवरणपत्राच्या तपासणीसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आणि निवडणूक आयोगाने एक संयुक्त योजना तयार केली आहे.

उमेदवारांच्या संपत्तीवर करडी नजर ठेवण्याच्या योजनेचाच हा एक भाग आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा उमेदवाराच्या स्थावर व जंगम संपत्तीत दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असेल अशा उमेदवारांचा लाल निशाणीच्या (रेड फ्लॅग्ज) यादीत समावेश होणार आहे. त्यानंतर कर अधिकारी अशा उमेदवारांच्या विविध श्रेणीतील संपत्ती (अ‍ॅसेट) बरोबरच त्यांचे करदायित्व तपासणार आहेत. सीबीडीटी आणि निवडणूक आयोगाने यासाठी पंचसूत्री तयार केली आहे. कर विभाग या पंचसूत्रीनुसारही उमेदवाराच्या विवरणपत्राची छाननी होईल. त्यामुळे संभाव्य कर चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या पॅन कार्डची सत्यता तपासणीही या पंचसूत्रीत समाविष्ट आहे.

पॅन कार्डला मोठे महत्त्व
कोणत्याही उमेदवाराने सादर केलेल्या विवरणपत्र तपासणीत त्या उमेदवाराच्या पॅन कार्डला अत्यंत महत्त्व राहील, असे या अधिकार्‍याने स्पष्ट केले. अधिकार्‍याने सांगितले की, सीबीडीटीने जास्तीत जास्त उमेदवारांच्या पॅन कार्डचा तपशील देण्यास सांगितले आहे. कारण पॅन कार्डद्वारे कोणत्याही उमेदवाराकडे असलेल्या संपत्तीची सत्यता योग्य रीतीने पडताळता येते. नकली पॅन कार्ड देणार्‍याचाही शोध घेणे यामुळे कर अधिकार्‍यांना सुलभ जाणार आहे.

X