आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - चढ्या किमतीमुळे सामान्यांना सध्या नाकानेही कांदे सोलणे मुश्कील झाले आहे; परंतु कृषिमंत्री शरद पवार यांनी 80 ते 90 रुपये किलोपर्यंत गेलेले कांद्याचे भाव आणखी दोन-तीन आठवडे तरी तसेच राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढे किमान विसेक दिवस तरी घरातल्या बजेटचा वांधा कायम राहणार असेच दिसत आहे.
कांद्याच्या किमतीचा विचार करता पुढील दोन ते तीन आठवडे कठीण असले तरी त्यावर उपाययोजना शोधून काढण्यात येईल, असे स्पष्ट करताना कृषिमंत्र्यांनी कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी साठेबाजी मोडून काढण्याचे आदेश राज्यांना दिले असल्याची माहिती दिली. पुढील दोन ते तीन आठवड्यांत किमती खाली येणार का, असे विचारले असता कृषिमंत्री पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. परंतु मला पिकांबद्दल थोडेसे कळते. त्यामुळे माझ्या अनुमानानुसार आणखी दोन ते तीन आठवडे तरी ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. ते ‘कृषी विज्ञान केंद्र 2013’ या आठव्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.
भारतापेक्षा कमी किंमत असलेल्या देशांमध्ये व्यापारी कांद्याची निर्यात करीत असल्याची शक्यता खोडून काढताना पवार म्हणाले की, अन्य देशांमध्ये कांद्याच्या किमती जवळपास 500 डॉलरच्या आसपास असून भारतात ती किंमत 900 डॉलर आहे. त्यामुळे कांदा कोणीही निर्यात करू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणीही निर्यात करू शकणार नाही.
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महामंडळाची काही प्रमाणात कांदा आयात करण्याची तयारी असल्याचे आपण खाद्यमंत्री के.व्ही. थॉमस यांना कळवणार असल्याचे स्पष्ट करून पवार पुढे म्हणाले की, आपल्याला कांदा लवकरात लवकर आयात करावा लागणार असून एखाद्या राज्याकडून विनंती आल्यास त्या दृष्टीने सज्ज राहण्याची तयारी करावी, असे नाफेडच्या महासंचालकांना कळवले आहे.
एकाधिकारशाहीमुळे भाववाढ
दिल्लीत 90 रुपये किलोपर्यंत गेलेल्या कांद्याच्या भाववाढीसाठी घाऊक व्यापार्यांची एकाधिकारशाही कारणीभूत असून ‘एपीएमसी’च्या कायद्यात सुधारणा न झाल्याने हे होत असल्याचे मत कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त केले आहे. अवकाळी पावसामुळे खरीप पिकांच्या कापणीला विलंब होऊन उत्तर भागातील पुरवठ्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. येणार्या काही दिवसांत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होऊन कांद्याच्या किमती लक्षणीय घसरतील, असे मत या अधिकार्याने व्यक्त केले.
आयातीसाठी नाफेडने निविदा मागवल्या
चढ्या किमतींच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील अग्रणी ‘नाफेड’ने पाकिस्तान, इराण, चीन आणि इजिप्त येथून कांदा आयात करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. हा कांदा नवी दिल्लीतील लॉरेन्स रोडवर असलेल्या गोदामात पाठवण्यात येणार आहे. हा कांदा लाल/ गुलाबी रंगातील असून त्याचा आकार 45 मि.मी. इतका असेल. त्याचप्रमाणे या कांद्याचा दर्जादेखील चांगला असेल. नाफेडने याअगोदर दोन सप्टेंबरला कांदा आयातीसाठी निविदा मागवल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.