मुंबई - पेन्शन यंत्रणेच्या गुंतवणूकविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेण्यासाठी निवृत्तिवेतन निधी नियामक ‘पीएफआरडीए’ने सेबीचे माजी अध्यक्ष जी. एन. बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. ही योजना आणखी आकर्षक करण्याच्या दृष्टीने त्यात काही बदलही ही समिती सुचवणार आहे.
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये याबाबत एक अध्यादेश काढल्यानंतर गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांचा पहिल्यांदाच आढावा घेणार आहोत. उगवत्या बाजारपेठांमधील स्थिती आणि आतापर्यंत आलेला अनुभव लक्षात घेऊन या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेण्यात येत असून पेन्शन फंडातील गुंतवणुकीसाठी योग्य संधींचा अभ्यास करण्यात येईल, असे ‘पीएफआरडीए’चे अध्यक्ष आर. व्ही. वर्मा यांनी सांगितले.
खासगी क्षेत्रासाठी असलेल्या एनपीएस योजनेच्या विद्यमान गुंतवणूक मार्गदर्शकतत्त्वांचादेखील आढावा घेण्यात येऊन त्यात आवश्यक ते बदल किंवा नवीन योजना सुचवण्यात येणाल्र असल्याचे ‘पीएफआरडीए’ने अध्यादेशात म्हटले आहे.
नव्या पेन्शन प्रणालीच्या गुंतवणूक रचनेशी निगडित असलेल्या अन्य काही गोष्टींबाबतही ही सहा सदस्यांची समिती
आपल्या शिफारशी सादर करून त्या सदस्यांच्या हितसंबंधाला पूरक ठरणा-या असतील. संपूर्ण पेन्शन प्रणाली अधिक सक्षम, कमी खर्चिक आणि बाजारानुकूल होण्याच्या दृष्टीने ती नॅशनल पेन्शन यंत्रणेअंतर्गत आणण्यात येणार असून ज्यामुळे जोखीम व्यवस्थापन कमी करण्यासाठी उपाययाेजना सुचवणे शक्य होऊ शकेल, असेही ते म्हणाले. ही समिती आपला अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याची शक्यता असून पेन्शन निधी व्यवस्थापन रोखेसंग्रहावर देखरेख यंत्रणा आणण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.
समितीतील सदस्य
दीपक सातवळेकर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स/ एस. बी. माथूर, माजी अध्यक्ष, एलआयसी/ सीआर मुरलीधरन, माजी सदस्य ‘इरडा’/ माधवी दास, कार्यकारी संचालक पीएफआरडीए.