आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Permission To Set Up Postal Bank Of India, Subramaniam Committee Recomandation

पोस्टल बँक ऑफ इंडिया सुरू करण्यास परवानगी, सुब्रह्मण्यम समितीची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टपाल खात्याला पोस्टल बँक ऑफ इंडिया सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची शिफारस माजी कॅबिनेट सचिव टीएसआर सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय समितीने केली आहे. समितीने पत्राचे वाटप वगळता टपाल विभागाला इतर सर्व कामांपासून वेगळे करण्याचा सल्ला दिला आहे.

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत समितीच्या अध्यक्षांनी आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला. सध्या देशात ३०००च्या आसपास टपाल कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये कोअर बँकिंग प्रणालीने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर सध्या काम सुरू आहे. याशिवाय टपाल कार्यालयांत एटीएम लावण्याची योजनादेखील प्रगतिपथावर असून लवकरच अशा स्वरूपाच्या सुमारे ३०० पोस्ट कार्यालयांत एटीएम कार्यरत केले जाणार आहेत.
टपाल विभागाला नफा व्हावा व कमाईच्या दृष्टिकोनातून सक्षम बनवता यावे यासाठी खासगी कंपन्या किंवा समूहांसोबत मिळून कंपनी स्थापन करण्याचाही सल्ला समितीने दिला आहे.

एकाच मशीनमध्ये मिळणार सर्व सेवा
देशभरात ग्रामीण भागातील सर्व पोस्ट कार्यालयांत हाताने चालवता येईल, अशी एक मशीन प्रदान करण्यात येणार आहे. हे मशीन एकाच सर्व्हरशी कनेक्ट असेल व त्याच्या साह्याने पैसे जमा करणे, काढणे, नवे खाते सुरू करणे, मनरेगाचे पेमेंट, मनीऑर्डर आदींसारख्या सेवा ग्राहकांना देता येतील. पहिल्या टप्प्यात मार्चअखेरपर्यंत एक हजार ग्रामीण टपाल कार्यालयांत हे मशीन बसवले जाणार आहे. पोस्ट कार्यालयांच्या संगणकीकृत योजनेपेक्षा ही योजना वेगळी असेल.

५ लाख नवे रोजगार मिळतील
समितीच्या शिफारशींचा अर्थ कोणत्याही सेवेचे दर वाढतील अथवा कुणाची नोकरी जाईल, असा होत नाही. उलट आमच्या शिफारशी मान्य केल्या व त्याची अंमलबजावणी झाली, तर पाच लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा समितीचा दावा आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
रविशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचारमंत्री