आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडीत गुंतवा, आकर्षक मिळवा; अल्प कालावधीसाठी जोखीम मुक्त सुरक्षित परतावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेअर बाजारातील सातत्याचे चढ-उतार व अस्थैर्यामुळे अनेकांना यात गुंतवणूक करणे जोखमीचे वाटते. सोने तसेच चांदीच्या घसरणार्‍या किमतीमुळे त्यातही पैसे गुंतवणे मनाला पटत नाही, अशी गुंतवणूकदारांची अवस्था आहे. अशा परिस्थितीत सध्या बँकांच्या मुदत ठेवी (एफडी) आकर्षक ठरताहेत. बँकांच्या एफडीवर मिळणारे व्याज इतर साधनांकडून मिळणार्‍या परताव्यापेक्षा जास्त आहे. हा परतावा अल्प कालावधीसाठी असला तरी जोखीम नसणारा व सुरक्षित असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
जानेवारीच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली होती. तेव्हा बँका ठेवींवरील व्याज कमी करतील, अशा अपेक्षा होत्या. मात्र, आतापर्यंत एखादा अपवाद वगळता कोणत्याच बँकेने कर्ज तसेच ठेवींवरील व्याज घटवले नाही. बँकांकडे निधींचा ओघ सुरू असतानाही हे चित्र कायम आहे. अर्थव्यवस्थेत तरलतेअभावी बँकांना मुदत ठेवींवरील व्याज जैसे थे ठेवावे लागत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार खेळत्या भांडवलाच्या समायोजन सुविधेअंतर्गत (एलएएफ) बँकांकडून गेल्या वर्षी घेण्यात येणार्‍या कर्जाच्या प्रमाणात आजही काहीच फरक पडलेला नाही.
एलएएफअंतर्गत तीन एप्रिल रोजी बँकांनी 1002 अब्ज रुपये, दोन एप्रिल रोजी 1209 अब्ज, 31 मार्च रोजी 222 अब्ज, 30 मार्च रोजी 353 अब्ज आणि 28 मार्च रोजी 1135 अब्ज रुपयांचे कर्ज घेतले.
गेल्या वर्षी (2012) बँकांनी 3 एप्रिल रोजी 1380 अब्ज रुपये आणि मार्च 2012 च्या शेवटच्या काही दिवसांत 1200 अब्ज रुपये कर्ज घेतले होते. विशेष म्हणजे, या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात दोन वेळा कपात केली आणि रोख राखीव रकमेच्या (सीआरआर) प्रमाणात एकदा कपात केली. बँकांच्या उच्चपदस्थांच्या मते, सध्या भांडवलाची चणचण जाणवत आहे. त्यामुळे बँकांनी मुदत ठेवींवरील व्याज कमी केले तर बँकांकडे येणारा निधीचा ओघ कमी
होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बँकांच्या अडचणी वाढू शकतात.

भांडवलाच्या चणचणीमुळे अडचण
युनियन बँकेच्या ट्रेझरी विभागातील एका अधिकार्‍याच्या मते, काही बँकांनी बल्क डिपॉझिट तसेच मार्चअखेर संपलेल्या एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. मात्र, बहुतेक बँका सध्या एफडीवर 8.50 ते 9.50 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत जर एखादी व्यक्ती 10 टक्के कर टप्प्यात (टॅक्स स्लॅब) येत असेल तर त्याला सध्याच्या एफडीवर मिळणारे करपश्चात व्याज फायदा देणारे आहे. भांडवलाची स्थिती अजूनही नाजूकच आहे. त्यामुळे सध्याचे व्याजदर आगामी काळात कायम राहण्याची शक्यता आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकार्‍याने सांगितले की, काही बँका मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करत आहेत. मात्र, आगामी काळात भांडवलाच्या स्थितीचा आढावा घेऊन बँका व्याजदराबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आकर्षक एफडीसाठी
सुरक्षित आणि आकर्षक परताव्यासाठी बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, इंडसइंड बँक, विजया बँक या बँकांतील एफडीमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय आहे.

8.50 ते 9.50
टक्के वार्षिक परतावा विविध बँकांच्या अल्पकालीन मुदतठेवींवर मिळत आहे