आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोब्रास-व्हिडिओकॉनला सापडला नवा तेलसाठा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दी जानेरिओ - व्हिडिओकॉन आणि भारत पेट्रोलियम यांची भागीदारी असलेल्या ब्राझीलमधील पेट्रोब्रास कंपनीला ब्राझीलच्या ईशान्य किनार्‍यावर सील-11 या तेलपट्टय़ात उच्च प्रतीच्या कच्च्या तेलाचा व नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. ब्राझीलमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा तेलसाठा असल्याचे पेट्रोब्रासने सांगितले. व्हिडिओकॉन आणि भारत पेट्रोलियम या भारतीय भागीदारांसह पेट्रोब्रास या भागात 2008 पासून उत्खनन करत आहे. सील-11 पट्टय़ात सापडलेला तेलसाठा अत्यंत महत्त्वाचा असून येथून अब्जावधी बॅरल तेलाचे उत्खनन करता येणार आहे.

ब्राझीलमधील सरजिप या राज्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या किनारी भागात सील-11 हा तेलपट्टा आहे. येथील तेलसाठय़ात 60 टक्के हिस्सा पेट्रोब्रासचा असून उर्वरित 40 टक्के हिस्सा व्हिडिओकॉन आणि भारत पेट्रोलियम यांचा आहे. सील -11 मध्ये सापडलेला तेलसाठा यंदाचा आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा तेल आणि वायूचा साठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या तेलसाठय़ाबाबत पेट्रोब्रासची ब्राझीलच्या कायदा खात्याशी चर्चा सुरू आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर नेमका साठा किती, याचा उलगडा होईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.