Home | Business | Auto | petrol price can once again hike

पुन्हा एकदा पेट्रोल महागणार !

वृत्तसंस्था | Update - Jun 09, 2011, 02:37 AM IST

सरकारी तेल कंपन्या १६ जूनपासून पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात पन्नास पैशांची वाढ करण्याची शक्यता

  • petrol price can once again hike

    नवी दिल्ली- मागील महिन्यात झालेल्या पेट्रोल दरवाढीतून कच्च्या तेलाचा खर्च भरून निघत नसल्याने सरकारी तेल कंपन्या १६ जूनपासून पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात पन्नास पैशांची वाढ करण्याची शक्यता आहे. ‘राजकीय दबाव न आल्यास आम्ही १५ जूनच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलचा भाव वाढवू इच्छितो’, असे विधान देशातील सर्वात मोठी तेल पुरवठादार कंपनी इंडियन आॅइल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिका-याने केले आहे. मागील महिन्यात झालेल्या पेट्रोल दरवाढीनंतरही तेल कंपन्यांना लिटरमागे ४ रुपये ५८ पैशांचे नुकसान सहन करावे लागत आहे. पेट्रोलच्या भावातील संभाव्य दरवाढ मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील कु्रड तेलाच्या दरांवरून गणण्यात आली आहे.

    डिझेल दरवाढीबाबत बोलताना या अधिका-याने सांगितले की, यात व्हॅटची भर टाकल्यास डिझेलची संभाव्य दरवाढ १४.२२ रुपये प्रति लिटर होऊ शकते. याचप्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसवरही कंपन्यांना ३८१ रुपये १४ पैशांचे, तर रॉकेलवर २७ रुपये ४७ पैशांचे नुकसान सोसावे लागत आहे.

    सरकारकडून नियंत्रित दरांवर इंधन विकल्याने कंपनीला दररोज २५६ कोटी रुपयांचे नुकसान होते. याच दराने पेट्रोल विक्री सुरू राहिल्यास चालू वित्तीय वर्षाच्या अखेरीस कंपनीला ८९,३०० कोटींचा फटका बसणार आहे. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे एकूण नुकसान वित्तीय वर्षाच्या अखेरीपर्यंत १६०,५६८ कोटींवर जाईल, असे या अधिका-याने म्हटले आहे.

    देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन आॅईलचे वित्तसंचालक पी. के. गोयल यांनी सांगितले होते की कंपनीला सध्या पेट्रोल विक्रीतून तोटा होत असला तरी १५ जूनपर्यंत पेट्रोलची कसलीही दरवाढ करण्यात येणार नाही.

Trending