आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या नूतनीकरणापूर्वी हवे योग्य नियोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले राहते घर जुने झाल्यास, कुटुंबाचा विस्तार झाल्यास किंवा सामाजिक प्रतिष्ठा म्हणून चांगल्या ठिकाणी राहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत काही काळानंतर घराचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता असते. घराच्या वाढत्या किमती लक्षात घेता जुन्या घराची चांगली सजावट करून त्याच घरात राहणे केव्हाही उत्तम. काही वेळा नव्या घरातही काही काम शिल्लक असते. ते करण्यासाठीही खर्च करावाच लागतो. हे लक्षात घ्यावे.

किती नूतनीकरण करायचे हे निश्चित करा : ज्यांची निकड नाही असे बदल करू नका. यामुळे अनावश्यक खर्चात बचत होईल. काही वेळा दुरुस्तीवर खर्च करण्यासाठी मोठी रक्कम लागते. त्यापेक्षा नवे घर खरेदी करणे परवडते. त्यामुळे काय काम करायचे आहे हे ठरवणे गरजेचे आहे.

खर्चाचा अंदाज घ्या : काय व कशाचे नूतनीकरण करायचे आहे याची यादी तयार करा. त्यानंतर त्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज घ्या. कंत्राटदार किंवा स्वत: चौकशी करून खर्चाचा अंदाज घेता येईल. बाजारात जाऊन साहित्य व त्यासाठी लागणा-या मजुरीबाबत चौकशी करा. ज्याला काम द्यायचे आहे, त्याच्या दराशी बाजारातील दरांची तुलना करा. जास्त फरक नसेल तर त्याच्याकडे काम सोपवा. मात्र त्याच्या काम आणि साहित्याच्या दर्जावर नजर ठेवा. अंदाजित खर्चापेक्षा 20 ते 25 टक्के जास्तीची रक्कम हाताशी ठेवा. यातून वाढीव साहित्य तसेच मजुरीचा खर्च भागू शकतो.

पैसे कसे उभारणार : हे आपल्या खर्चाच्या अंदाजपत्रकावर अवलंबून आहे. याची पूर्तता बचतीतून करणार की कर्ज घ्यावे लागणार हे लक्षात घ्या. खर्च कमी येणार असेल आणि त्यातून दीर्घकालीन आर्थिक नियोजन बिघडणार नसेल तर बचतीची रक्कम यासाठी वापरण्यास हरकत नाही. जास्त रकमेसाठी कर्ज घेणे सोयीस्कर.
याचाच अर्थ कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा.


कर्ज घेताना लक्षात ठेवण्याच्या बाबी : सध्या बहुतेक बँका घराची सुधारणा, रिपेअरिंग, नूतनीकरण यासाठी कर्ज देतात. बँका पुढे उल्लेख केलेल्या कामासाठी कर्ज देतात : 1. टेरेसच्या वॉटर प्रूफिंगसह बाहेरील बाजूची दुरुस्ती. 2. टाइल्स बदलणे आणि फ्लोअरिंग. घराची आतून-बाहेरून डागडुजी. 3. प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल कामे. 4. वॉटरप्रूफिंग आणि रूफिंग. 5. ग्रिल्स आणि अ‍ॅल्युमिनियम खिडक्या. 6. अंडरग्राउंड आणि ओव्हरहेड टँक बांधणे. 7. कम्पाउंड वॉलवर दगडी काम, टाइल्स आदी बसवणे. 8. बोअरवेल किंवा वॉटरसोर्सिंग.

काही बँका रिनोव्हेशनअंतर्गत फर्निचर, फर्निशिंग्‍ज, पंखे आणि एअर कंडिशनर खरेदीसाठीही कर्ज देतात. रिनोव्हेशनच्या अंदाजे खर्चाच्या 75 ते 80 टक्के रक्कम कर्जापोटी मंझूर होते. कर्जाचा अवधी अर्जदाराच्या वयानुसार 20 वर्षांपर्यंत असू शकते. व्याजदर 10.5 ते 14 टक्क्यांपर्यंत असू शकतात. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे उभे केल्यास 3 ते 4 टक्के महाग पडू शकते. रक्कम लवकर फेडता येण्याच्या परिस्थितीतच हा पर्याय निवडावा. मुदत ठेवींच्या (एफडी) बदल्यात बँक ओव्हरड्राफ्ट घेणे हासुद्धा एक चांगला पर्याय आहे.
लेखक bankbazaar.com सीईओ आहेत.