आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर वाहन विक्रीत तेजीची गुढी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील मोटारींची विक्री 2012-13 या वर्षात 6.69 टक्क्यांनी घसरलेली असली तरी सध्याच्या आर्थिक वातावरणात सुधारणा झाल्यास चालू वित्तीय वर्षात प्रवासी मोटारींच्या विक्रीत तीन ते पाच टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ अर्थात ‘सियाम’ या संस्थेने व्यक्त केला आहे.

वाहन क्षेत्रातील सर्व विभागांच्या चांगल्या कामगिरीमुळे 2013-14 या वर्षात देशातील सर्व वाहनांच्या एकूण विक्रीमध्ये 6 ते 8 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यतादेखील सियामने व्यक्त केली आहे.

येणार्‍या काळातील अनिश्चिततेच्या वातावरणाची चिंता असली तरी वाहन उद्योगाच्या आशा कायम आहेत. सरकारने काही सकारात्मक धोरणात्मक निर्णय घेतल्याचा चांगला परिणाम दिसत असून आर्थिक पातळीवरदेखील सुधारणा होण्याची अपेक्षा ‘सियाम’चे अध्यक्ष एस. शांडिल्स यांनी व्यक्त केली.

मोटारींच्या विक्रीने सध्या रिव्हर्स गिअर टाकला आहे, परंतु नजीकच्या काळात बाजारात येणार्‍या नवीन मोटारी वाहन बाजाराला उभारी मिळू शकेल. त्याचप्रमाणे नवीन मोटारी या आणखी सुधारित वैशिष्ट्यांसह बाजारात येणार असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षात मोटारींच्या विक्रीत चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे.

ग्राहकांची वाहन खरेदीची मानसिकता बदलत असून आता ते लहान मोटारींकडून मोठय़ा मोटारी आणि युटिलिटी वाहनांकडे वळू लागले असल्याकडे लक्ष वेधतानाच वाहन बाजारात अनेक मोटार कंपन्यांकडून नवीन वाहने प्रवेश करणार असल्याने युटिलिटी वाहनांच्या विक्रीतील वाढ कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले.

सियामच्या अंदाजानुसार चालू वर्षात प्रवासी मोटारींच्या विक्रीत तीन ते पाच टक्क्यांनी, तर युटिलिटी वाहनांच्या विक्रीत 11 ते 13 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. प्रवासी वाहनांची एकूण विक्री यंदाच्या आर्थिक वर्षात पाच ते सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षामध्ये प्रवासी मोटारींची विक्री घसरून ती अगोदरच्या वर्षातल्या 20,31,306 मोटारींवरून 18,95,471 मोटारींवर आली.

मंदावलेली आर्थिक वाढ, सामान्यांची कमी झालेली मानसिकता, व्याजाचे चढे दर आणि इंधनांच्या प्रामुख्याने पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीचा चालू आर्थिक वर्षातल्या वाहन विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. वाहनाची एकूण विक्री (सर्व विभाग) 2013 -14 वर्षात 6 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. दुचाकी वाहनांची विक्री 2013 -14 मध्ये 6 ते 8 टक्क्क्यांनी वाढण्याचा अंदाज सियामने व्यक्त केला आहे.

स्कूटरची मागणी वाढली असून बाजारात येणार्‍या नव्या दुचाकींमुळे ती आणखी वाढणार आहे. परंतु मोटारसायकलींची विक्री ग्रामीण भागातील मानसिकतेवर अवलंबून असेल, असेही ते म्हणाले.

व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये साधारणपणे सात ते आठ टक्के वाढ होण्याची अपेक्षा असून त्यामध्ये हलक्या व्यावसायिक वाहनांचा वाटा जास्त असेल. या वाहनांच्या विक्रीत आर्थिक वर्ष 2014 मध्ये 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

दुसरी सहामाही महत्त्वाची

मध्यम-अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीबाबत चिंतेचे वातावरण असून त्यांच्या विक्रीत 1 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. दुसर्‍या सहामाहीत त्यात सुधारणा होण्याची शक्यता शांडिल्य यांनी व्यक्त केली. मान्सून, सरकारची धोरणे, केंद्रातील सरकारची स्थिरता, आदींवर वाहन उद्योगाची वाटचाल अवलंबून राहणार असल्याचेही ते म्हणाले.