आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Post Office Fix Deposit News In Marathi, Business, Provident Fund

अल्पबचतीच्या व्याजात वाढ, भविष्य निर्वाह वरील व्याज 8.7 टक्क्यांवर जैसे थे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजत असतानाच सरकारने टपाल कार्यालयातील मुदत ठेवी, अल्पबचतीवरील व्याजदरात 0.20 टक्के वाढ केली आहे. पोस्ट ऑफिस एफडी या नावाने गुंतवणूकदारांत प्रिय असणा-या विविध योजनांवर ही व्याजदर वाढ एक एप्रिलपासून लागू होणार आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर गतवर्षीचेच 8.70 टक्के कायम ठेवण्यात आले आहेत.


लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी मंगळवारी रात्री वित्त मंत्रालयाने पोस्ट ऑफिस एफडी योजनांवरील व्याजदर वाढ जाहीर केली. पोस्टातील एक ते दोन वर्षे मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याज 8.2 टक्क्यांवरून 8.4 टक्के असे करण्यात आले आहे. तीन ते पाच वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात 0.1 टक्का वाढ करण्यात आली. आता या ठेवींवर 8.3 टक्क्यांऐवजी 8.4 टक्के व्याज मिळणार आहे. पाच वर्षे मुदतीच्या आवर्ती जमा ठेव (आरडी) योजनेवरील व्याजदर 0.1 टक्क्याने वाढवण्यात आले असून आरडीवर एक एप्रिलपासून 8.4 टक्के व्याज मिळणार आहे.


राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या पाच वर्षे आणि दहा वर्षे मुदतीच्या योजनेवरील व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. मासिक प्राप्ती योजनेवरील (एमआयएस) व्याजदर 8.4 टक्के असे कायम ठेवण्यात आले आहेत. बचत ठेवीवरील व्याजदरही 4 टक्के असे कायम आहेत.


श्यामला गोपीनाथ समितीच्या शिफारशीनुसार ही व्याजदर वाढ करण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले. अल्पबचत ठेवींवर आकर्षक व्याज द्यावे, अशी शिफारस या समितीने केली होती. तसेच अल्पबचत ठेवींवर आकारण्यात येणारे व्याज समान मुदतीच्या सरकारी रोख्यांवरील व्याजदरांप्रमाणे असावे, या समितीच्या शिफारशीनुसार व्याजदर वाढ करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष सरताना अल्पबचतीवरील व्याजदराचा आढावा घेऊन एक एप्रिलपूर्वी त्याची घोषणा करावी, अशी शिफारसही गोपीनाथ समितीने केली होती. त्यानुसार वित्त मंत्रालयाने व्याजदर वाढ केली.


पीपीएफवर व्याज : 8.7 टक्के
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (पीपीएफ) चालू आर्थिक वर्षात 8.7 टक्के व्याज मिळणार आहे. मागील आर्थिक वर्षात पीपीएफ मिळणारे व्याजदरच जैसे थे ठेवण्यात आले आहेत. तसेच एका आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात जास्तीत जास्त एक लाख रुपये गुंतवणुकीच्या मर्यादेतही बदल करण्यात आलेला नाही.


नवे व्याजदर एक एप्रिलपासून
योजना जुने व्याज नवे व्याज
एफडी मुदत ठेवी 8.2% 8.4 %
एफडी मुदत ठेवी 8.3% 8.4 %
आरडी 8.3% 8.4%
एनएससी 8.5% 8.5%
एमआयएस 8.4% 8.4%
बचत ठेवी 4% 4%


तुलना : बँकांच्या एफडीवरील व्याजदर
पोस्टातील एफडीप्रमाणेच गुंतवणूकदारांत विविध बँकांच्या मुदत ठेवी लोकप्रिय आहेत. त्यांचे सध्याचे सरासरी व्याजदर असे :


एफडी योजना व्याजदर
180 दिवस ते 364 दिवस 7.50 ते 9.10%
एक ते दोन वर्षे 9.25 ते 9.30%
दोन ते तीन वर्षे 8.50 ते 9.30%
तीन ते पाच वर्षे 8.75 ते 9.10%