मुंबई - जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास आता सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वायदा बाजार आयोगाने नवीन वायदे व्यवहार करण्यास 18 जूनपासून मज्जाव तसेच खरेदीदारांच्या ठेव रकमेत वाढ करणे या माध्यमातून किमती नियंत्रणात आणण्याचे उपाय योजले आहेत.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील बटाट्याच्या वायदे व्यवहारांना लगाम घालण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. पाऊस अद्याप हवा तसा पडत नसल्याने कांदा, बटाट्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांना झळ बसू लागली आहे. त्यामुळे वायदा बाजार आयोगाने हा निर्णय घेतला आहे. सध्या एमसीएक्स बाजारात बटाट्याचे वायदे व्यवहार होत असून एनसीडेक्समध्ये या व्यवहाराचे प्रमाण नगण्य आहे. वायदा बाजार आणि किरकोळ बाजारातील किंमत वाढ यामध्ये तसा कोणताही परस्पर संबंध नसला, तरीही वायदा बाजार आयोगाने खबरदारीचा उपाय केला असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले.