आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीपीएफ, ईपीएफ, एनपीएस : कर वाचवणारी सोपी साधने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्राप्तिकर वाचवणारे सहसा परताव्याचा विचार न करता सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देतात. कर बचत करणा-या अशा पर्यायांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यांचा समावेश होतो. दीर्घकाळासाठी बचत करणा-या या साधनांचा वापर मुख्यत: निवृत्तीकरिता निधी जमवण्यासाठी होतो. या योजनांत जमा होणा-या 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळतो.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) : सध्या ईपीएफवर 9.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. अपना पैसा डॉट कॉमचे सीएफओ बलवंत जैन यांनी सांगितले की, यात जमा होणा-या 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कलम 80 सी अंतर्गत प्राप्तिकरातून सूट मिळते. एवढेच नव्हे तर यावर मिळणारे व्याजही करमुक्त आहे. तसेच मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कमही करमुक्त आहे. मोठे आजारपण, विवाह समारंभ यासाठी गरज पडल्यास ईपीएफ खात्यातून पैसे काढता येतात. बचतीचा हा पर्याय अत्यंत सुरक्षित आहे. पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर यापैकी एकाने ईपीएफमधील गुंतवणुकीची रक्कम वाढवणे अधिक चांगले ठरेल. ईपीएफवरील व्याजदरात वारंवार बदल होतात हे लक्षात घ्यावे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) : दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी जसे मुला-मुलींचे विवाह तसेच शिक्षणासाठी कर बचतीचा लाभ घेत पीपीएफद्वारे मोठा निधी जमवता येतो. याची मुदत 16 वर्षे असते. या खात्यात एका वर्षात जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवता येते. सध्या पीपीएफवर 8.6 टक्के व्याज मिळते. या व्याजदरात दरवर्षी बदल होऊ शकतात. मुदतीनंतर मिळणारी पीपीएफची रक्कम करमुक्त असते. स्टेट बँक ऑफ इंडिया, तिच्या सहयोगी बँका, अन्य राष्ट्रीयीकृत बँकांत तसेच मुख्य पोस्ट ऑफिस व इतर पोस्ट कार्यालयांत पीपीएफचे खाते उघडता येते. पोस्टात हे खाते उघडणे अधिक सोईचे ठरते.
राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) : निवृत्तीनंतरच्या गरजा भागवणारी एनपीएस ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे. प्रारंभीच्या काळात ही योजना केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचा-यांसाठी होती. मात्र, 1 मे 2009 पासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. यातील श्रेणी-1 खात्यातील रकमेवर करसवलत मिळते, तर श्रेणी-2 प्रकारच्या खात्यावर ही सवलत मिळत नाही. श्रेणी-2 खात्याचा वापर बचत खात्याप्रमाणे करता येतो.

भरपूर फायदा देणा-या बचत योजना
ईपीएफमध्ये जमा होणा-या 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कलम 80 सी अंतर्गत प्राप्तिकरातून सूट मिळते. एवढेच नव्हे, तर यावर मिळणारे व्याजही करमुक्त आहे. मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कमही करमुक्त आहे.
पीपीएफद्वारे दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी जसे मुला-मुलींचे विवाह तसेच शिक्षण यासाठी कर बचतीचा लाभ घेत मोठा निधी जमवता येतो. याची मुदत 16 वर्षे असते.
एनपीएस ही निवृत्तीनंतरच्या गरजा भागवणारी एक दीर्घकालीन बचत योजना आहे. यात जमा होणा-या एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर करसवलत मिळते.