आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Private Banks Benefited Due To Giving High Interest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बचत खात्यावर अधिक व्याज, लहान खासगी बँका तुपाशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बचत खात्यावर जवळपास 7 टक्क्यांपर्यंत सर्वाधिक व्याजदर देण्याचा येस बॅँक, इंडसइंड बँक आणि कोटक महिंद्रा बॅँक यांसारख्या नव्या पिढीतील बॅँकांना जास्त फायदा झाला आहे. परिणामी राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या तुलनेत या नवीन बॅँकांच्या बाजारहिश्शात चांगली वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.
नव्या पिढीतील या बॅँकांच्या वाढीव बचत खात्यातील ठेवींच्या बाजारहिश्शात जवळपास चारपट वाढ झाली असल्याचे एका आकडेवारीमधून दिसून आले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत असलेला एक टक्का बाजारहिस्सा यंदाच्या जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत 4 टक्क्यांपर्यंत गेला आहे. याच कालावधीत राष्ट्रीयीकृत बॅँकांचा एकत्रित बचत खात्याच्या बाजारहिश्शात मात्र घसरण झाली आहे. परंतु मोठय़ा खासगी बॅँका मात्र आपला हा बाजारहिस्सा कायम राखण्यात यशस्वी झाल्या आहेत.
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात बचत खात्यावरील व्याजदर नियंत्रणमुक्त केल्यानंतर नव्या पिढीतील लहान खासगी बॅँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली. विशेष म्हणजे हे व्याजदर अन्य बॅँकांच्या तुलनेत जास्त होते. परिणामी या बॅँकांना बचत खाती चांगल्या प्रकारे आकर्षित करता येऊ शकली.
एस्पिरिटो सॅँटो इन्व्हेस्टमेंट बॅँक या जागतिक पातळीवरील आघाडीच्या वित्तीय संस्थेने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार खासगी क्षेत्रातील नव्या लहान बॅँकांनी बचत खात्यावरील व्याजदरात सर्वाधिक वाढ केली, तर बड्या खासगी बॅँकांची बचत ठेवी गोळा करण्याची प्रगती मंदावली आणि राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या ठेवी संकलनात घसरण झाली असल्याचे म्हटले आहे. प्रारंभीच्या टप्प्यात राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या तुलनेत नव्या पिढीतील खासगी बॅँकांनी बाजारहिस्सा कमावला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

येस बॅँक एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर 6 टक्के तर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर 7 टक्के व्याज बचत खात्यासाठी देत आहे. इंडसइंड बॅँक आणि कोटक बॅँक याच रकमेसाठी अनुक्रमे 5.5 टक्के आणि 6 टक्के व्याज देत आहे.

नव्या पिढीतील खासगी बॅँकांनी बचत खात्यावर देऊ केलेले वाढीव व्याजदर यापुढेही कायम ठेवण्याची शक्यता आहे. अन्य बॅँकांच्या तुलनेत बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देऊन जास्त स्पर्धात्मक राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. बचत खात्यावरील व्याजदर नियंत्रणमुक्त झाल्यानंतर येस बॅँक, इंडसइंड बॅँक आणि कोटक बॅँक यांनी व्याजदरात वाढ केल्यामुळे त्यांना बचत खात्यातील ठेवी जास्त गोळा करण्यास मोठय़ा प्रमाणावर मदत झाली आहे. आयसीआयसीआय बॅँक, एचडीएफसी बॅँक आणि अँक्सिस बॅँक यासारख्या खासगी क्षेत्रातील बड्या बॅँकांना गेल्या काही तिमाहीपासून आपला बाजारहिस्सा कायम राखता आला आहे. या बॅँकांचे बचत खात्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून ते आताच्या चौथ्या तिमाहीपर्यंत 27.9 टक्के नोंद झाले आहे. परंतु दुसर्‍या बाजुला सार्वजनिक क्षेत्रातील पाच बड्या बॅँकांच्या बाजारहिश्शात मात्र घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील 26.6 टक्क्यांवरून हा बाजारहिस्सा घसरून यंदाच्या चौथ्या तिमाहीत 25.2 टक्क्यांवर आला आहे.