आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांनी विंडो एसी खिडकीचे उत्पादन केले बंद; विंडो एसी होणार गायब...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्प्लिट वातानुकूलित यंत्र (एसी) आले आणि खिडकीतील एसीचा (विंडो) भाव एकदम कमी झाला. ग्राहकांनी स्प्लिट एसी खरेदीकडे मोर्चा वळवला. विंडो एसीचा बाजारातील हिस्सा कमी झाला. त्यामुळे अनेक नामवंत कंपन्यांनी विंडो एसीचे उत्पादन बंद केले. सध्या ज्या कंपन्या विंडो एसीचे उत्पादन करताहेत त्यांनीही उत्पादन बंद करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे भारतीय बाजारातील विंडो एसीची खिडकी बंद होण्याच्या
मार्गावर आहे.

यंदाचे वर्ष विंडो एसीसाठी शेवटचे वर्ष मानले जात आहे. बाजारात स्प्लिट एसीच्या विक्रीचा वाटा 75 ते 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सॅमसंग इंडिया, ब्ल्यू स्टार, ओनिडा, डायकिन इंडिया या कंपन्यांनी विंडो एसीचे उत्पादन बंद केले आहे, तर एलजी इंडिया, हिताची आणि कॅरिअर मायडिया इंडिया यांच्या एकूण एसी विक्रीत 80 टक्के विक्री स्प्लिट एसीची आहे. सॅमसंगचे उपाध्यक्ष (कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स) महेश कृष्णन यांनी सांगितले. कंपनीने विंडो एअर कंडिशनरचे उत्पादन बंद केले आहे. स्प्लिट एसीच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. दक्षिण तसेच उत्तर भारतात विंडो एसीच्या मागणीत घट झाली आहे.

ब्ल्यू स्टार इंडियाचे अध्यक्ष (एसी अँड रेफ्रिजरेटर) बी. थियांगराज यांनी सांगितले, ऊर्जा वापराच्या मानदंडाकडे अधिक लक्ष देण्यात आल्याने विंडो एसीच्या किमतीत वाढ होत आहे. आम्हीही विंडो एसी सेगमेंटमधून बाहेर पडणार आहोत. ओनिडाचे सीएमडी जी. एल. मीरचंदानी यांनी सांगितले, कंपनी विंडो एसी सेगमेंटमधून बाहेर पडली आहे. त्याच्या मागणीत मोठी घट आली आहे. असेच चित्र स्थिती एलजी इंडिया आणि हिताची या कंपन्यांबाबतहीआहे.

घटता हिस्सा - गेल्या काही महिन्यांपासून विंडो एसीच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे.
उत्पादन बंद
- सॅमसंग इंडियासह ब्ल्यू स्टार, ओनिडा, डायकिन इंडिया या कंपन्यांनी विंडो एसीचे उत्पादन बंद केले आहे.
- सध्या ज्या कंपन्या विंडो एसीचे उत्पादन करताहेत त्याही उत्पादन बंद करण्याच्या विचारात आहेत.

स्प्लिट एसीला मागणी - भारतीय बाजारात स्प्लिट एसीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
बाजारात स्प्लिट एसीच्या विक्रीचा वाटा 75 ते 80 टक्क्यांवर पोहोचला आहे.