आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफारूपी विक्रीचा तेजीला लगाम; सेन्सेक्स, निफ्टी घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजारात पुन्हा येऊ लागलेला भांडवलीचा ओघ त्यातच अलीकडच्या काही सत्रांमध्ये बाजारात आलेल्या तेजीमध्ये इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह काही बड्या कंपन्यांच्या समभाग किमतीत चांगली वाढ झाली. नेमका त्याचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीमुळे गेल्या तीन दिवसांपासून बाजारात आलेली तेजी आटून सेन्सेक्स 113 अंकांनी गडगडला.


गेल्या तीन सत्रांमध्ये एक हजार अंकांची कमाई केल्यानंतर सेन्सेक्स 113.57 अंकांनी घसरून 19,529.31 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 41.30 अंकांनी घसरून 5857.55 अंकांच्या पातळीवर बंद झाला.


मागील आठवड्यात बाजारात आलेल्या तेजीत सेन्सेक्सने नवीन कमाल पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी रिलायन्स आणि इन्फोसिस यासह काही मोठ्या कंपन्यांच्या समभागांची विक्री करून नफा पदरात पाडून घेण्याचे धोरण ठेवल्याचे मत शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, परंतु स्थावर मालमत्ता, वाहन आणि बॅँक समभागांना मात्र विक्रीचा झटका बसला. दुपारच्या सत्रानंतर रुपया पुन्हा 16 पैशाने घसरून 59.67 च्या पातळीवर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी भांडवल बाजारातून 1.48 कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. जून महिन्यात वाहन कंपन्यांनी केलेल्या खराब कामगिरीची नाराजी गुंतवणूकदारांनी विक्री करून व्यक्त केली. परिणामी टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅँड महिंद्र, मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो या कंपन्यांना फटका बसला.