आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफारूपी वसुली सुरूच राहणार...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या आठवड्यात शेअर बाजार अपेक्षेप्रमाणे मर्यादित कक्षेत राहिला आणि नफेखोरीही दिसून आली. दिशादर्शक घटकांच अभाव आणि महसुली तसेच चालू खात्यातील तूट यांसारख्या आर्थिक घटकांमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मार्चपर्यंत वित्तीय तूट भरून काढण्यासाठी शेवटचा उपाय करण्यावर भर दिला आहे. कल्याणकारी योजना, संरक्षण आणि रस्ते योजनांवरील कर्चात कपात केली आहे. त्यामुळे अल्प काळासाठी आर्थिक विकास मंदावण्याची शक्यता वाढली आहे. प्रस्तावित कपातीमुळे चालू आर्थिक वर्षात सरकारी खर्चात सुमारे 1.10 लाख कोटी रुपयांची (20.6 अब्ज डॉलर) तूट येण्याची शक्यता आहे. हे प्रमाण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 8 टक्के असून अंदाजित जीडीपीच्या एक टक्का आहे. हे उपाय अर्थव्यवस्थेची गंभीर स्थिती दर्शवतात. प्रमुख रेटिंग एजन्सीजकडून भारताची पत घटवण्याचा धोकाही मोठा चिंतेचा विषय आहे. भारताने आणखी उपाय करावेत, असा इशारा सोमवारी फिचने दिला आहे. मध्यम अवधीसाठी सरकारने एक विश्वासार्ह योजना आखावी, असेही फिचने सुचवले आहे. ही सर्व कारणे पाहता येणा-या बजेटमध्ये काय उपाय असतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. यामुळे गुंतवणूकदारांची बेचैनी वाढते आहे.

देशातील शेअर बाजारात सकारात्मक वातवरणाचा दुष्काळ आहे, कारण अनेक सकारात्मक घटकांवर बाजाराने आपली प्रतिक्रिया या आधीच नोंदवली आहे. त्यातच डिझेलच्या किमतीत दरमहा होणारी वाढ आणि अन्नधान्याच्या चढ्या किमतीमुळे महागाईचा दबाव पुन्हा वाढू शकतो. जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांत मात्र सुधारणा दिसते आहे. अमेरिकेतील अकृषी क्षेत्रातील रोजगाराची आकडेवारी, चीनमधील उत्पादनाचा पीएमआय आणि युरोझोनमधील काही देशांत सकारात्मक वातावरण आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांत तेजी दिसते आहे.

देशातील बाजाराला असे कोणतेही ठोस कारण दिसत नसल्याने येथील शेअर बाजार मर्यादित कक्षेत असून वेळोवेळी त्यात नफेखोरी दिसून येत आहे. निफ्टीला खालच्या स्तरावर 5932 वर चांगला सपोर्ट आहे. घसरणा-या निफ्टीसाठी ही चांगली आधार पातळी ठरेल. या पातळीखाली आल्यास निफ्टी 5881 पर्यंत घसरू शकतो. हा एक तार्किक सपोर्ट आहे, फारसा टिकणारा नाही. ताज्या कॉन्सोलिडेशननंतर निफ्टीची आधार पातळी 5821 पर्यंत येऊ शकते. माझ्या मते हीच आधार पातळी असायला हवी, तर वरच्या बाजूने निफ्टीला 5971 वर अडथळा होईल. ही पातळी निफ्टीने चांगल्या व्हॉल्यूमसह पार केली तर निफ्टी पुन्हा सहा हजाराचा टप्पा पार करू शकते. त्यापुढे निफ्टीला 6011 वर अडथळा होईल, तर पुढील अडथळा 6068 या पातळीवर मिळेल. हा महत्त्वाचा अडथळा असून अल्प काळासाठीचे कल या पातळीमुळे ठरतील.

शेअर्सबाबतीत या आठवड्यात एसीसी लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड आणि बायोकॉन लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. एसीसी लिमिटेडचा मागील बंद भाव 1323.30 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1346 आणि स्टॉप लॉस 1293 रुपये आहे. इंडसइंड बँकेचा मागील बंद भाव 434.05 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 442 आणि स्टॉप लॉस 424 रुपये आहे, तर बायोकॉन लिमिटेडचा मागील बंद भाव 281.85 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 288 आणि स्टॉप लॉस 273 रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
Vipul.verma@dainikbhaskargroup.com