आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापक गुरुवारी ठरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निधी व्यवस्थापनासाठी लावण्यात आलेल्या बोलीत आयसीआयसीआय सेक्युरिटीज प्रायमरी डीलरशिप, रिलायन्स कॅपिटल एएमसी आणि एचएसबीसी एएमसी या कंपन्या अव्वल बोली लावणा-या ठरल्या आहेत. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीडी) १९ फेब्रुवारी रोजी होणा-या बैठकीत तीन वर्षांसाठी निधी व्यवस्थापकाच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय होईल. ईपीएफओ बाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय विश्वस्त मंडळाला आहेत. तीन वर्षांचा हा कालावधी एक एप्रिलपासून सुरू होईल.

ईपीएफओच्या निधी व्यवस्थापनासाठी सहा मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या पात्र ठरल्या होत्या. या वेळी एसबीआयनेही बोली लावली होती. मंडळाने एसबीआयला दुस-या एका निधीच्या व्यवस्थापनासाठी यापूर्वीच नियुक्त केले आहे. येत्या गुरुवारी होणा-या मंडळाच्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी देण्याची शक्यता आहे. मंडळाने आयसीआयसीआय सेक्युरिटीजला अव्वल बोलीची श्रेणी दिली आहे. त्यानंतर रिलायन्स कॅपिटल आणि बिर्ला सनलाइफचा क्रमांक आहे. इतर बोलीकर्त्यांत यूटीआय एएमसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियलआदींचा समावेश आहे. सध्या एसबीआय, एचएसबीसी एएमसी, रिलायन्स कॅपिटल एएमसी व आयसीआयसीआय प्रायमरी डीलरशिप हे ईपीएफओच्या निधीचे व्यवस्थापन पाहतात. त्यांची मुदत ३१ मार्च २०१५ रोजी संपणार आहे. आयसीआयसीआय प्रायमरी डीलरशिपने ईपीएफओच्या निधी व्यवस्थापनासाठी सर्वात कमी ०.०००००००००५ टक्के बोली लावली आहे. याचाच अर्थ १००० कोटी रुपयांच्या व्यवस्थापनासाठी ते ५ रुपये शुल्क आकारणार आहेत. अशा रीतीने रिलायन्स कॅपिटलने ०.०००००९ टक्के शुल्क, तर युटीआयने ०.००२५ टक्के, एचएसबीसीने ०.००४३ टक्के शुल्काची बोली लावली आहे.

दृष्टिक्षेपात ईपीएफओ
*५ कोटींहून जास्त सदस्य
*६.५ लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करते ईपीएफओ
*७०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभांश मिळतो दरवर्षी
*७९,००० कोटी रुपये लाभांश चालू आर्थिक वर्षात मिळण्याचा अंदाज