आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करबचतीसाठी सर्वोत्तम पर्याय-पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पोस्ट ऑफिसच्या काही योजना, विमा, म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस योजना(इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम), बँकेच्या पाच वर्षांच्या मुदत ठेवी इत्यादी काही योजनांत गुंतवणूक करून करबचत करता येते. पण करबचतीचे सर्वोत्तम-सुरक्षित साधन आहे पीपीएफ; म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी). करबचतीसाठी सर्वात आधी यात गुंतवणूक करावी, मग इतर साधनांचा विचार करावा.

पीपीएफविषयी आपण अधिक जाणून घेऊ :
ही सरकारी योजना आहे, त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच ही डेट या प्रकारात येते, म्हणजे शेअर मार्केटशी याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे यातील गुंतवणुकीचे मूल्य वरखाली होत नाही. यात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला पोस्टात किंवा बँकेत पीपीएफचे खाते उघडावे लागते. बहुतेक सर्व सरकारी बँकांत व काही खासगी बँकांत हे खाते उघडता येते. मात्र प्रत्येक शाखेमध्ये ते उघडता येत नाही. काही ठरावीक शाखांमध्येच ही सोय असते. नोकरदार किंवा व्यावसायिक व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतात. आपल्या अज्ञान (मायनर) पाल्याच्या वतीने पालकही यात गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीय मात्र पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत. पण कोणी खाते उघडले व नंतर अनिवासी भारतीय झाला तर मुदत संपेपर्यंत नॉन-रिपॅट्रिएशन तत्त्वावर यात तो गुंतवणूक करत राहू शकतो.
यातील गुंतवणुकीला 15 वर्षांचा लॉक-इन असतो, म्हणजे 15 वर्षे झाल्याशिवाय खाते बंद करता येत नाही.
हा दीर्घ कालावधी खरे तर आपल्या फायद्याचाच आहे, कारण आपण नियमित बचत करत राहतो व निवृत्तीनंतर त्याचा आपल्याला लाभ मिळतो. परंतु आकस्मिक कारणासाठी पैसे हवे असतील तर खाते सुरू केल्यानंतर तीन वर्षे ते पाच वर्षे त्यात शिल्लक असलेल्या रकमेवर काही प्रमाणात कर्ज मिळू शकते. तसेच सहाव्या वर्षापासून अंशत: रक्कम काढून घेता येते. 15 वर्षे झाल्यानंतरही पाच-पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये मुदत वाढवत हे खाते आपण पुढे अनेक वर्षे सुरू ठेवू शकतो.

दरवर्षी यात कमीत कमी 500 रुपये भरून हे खाते सुरू ठेवावे लागते. एका वर्षात जास्तीत एक लाख रुपये आपण यात जमा करू शकतो. तसेच एका वर्षात जास्तीत जास्त बारा वेळा आपण पैसे जमा करू शकतो. बहुतेक लोक वर्षातून एकदाच मोठी रक्कम त्यात जमा करतात व तेच सोयीचे असते. शक्यतोवर महिन्याच्या 1 ते 5 या तारखेच्या दरम्यान पैसे जमा करावेत, कारण 5 तारखेला जी रक्कम जमा असेल त्याआधारे त्या महिन्याचे व्याज मिळते. आपण गुंतवलेल्या रकमेवर आयकराच्या सेक्शन 80-सी खाली सूट मिळते. करबचतीच्या इतर योजानांपेक्षा पीपीएफचा महत्त्वाचा फायदा असा की यातील गुंतवणुकीवर मिळणारे व्याजही करमुक्त असते व मुदतीअंती मिळणारी रक्कमही करमुक्त असते. वर्ष म्हणजे वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हे कृपया लक्षात घ्यावे.

यातील जमा असलेल्या रकमेवर सध्या 8.80 टक्के प्रतिवर्ष या दराने व्याज मिळते. हा व्याजाचा दर दरवर्षी निश्चित केला जातो व तो कमी-जास्त होत असतो. यात चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत असल्याने मुदतीअंती मोठी रक्कम हातात येते. यातील गुंतवणूक कोर्टाच्या अटॅचमेंटपासून मुक्त आहे, हाही एक फायदा आहे.

जर एखाद्या वर्षात आपण यात काहीच रक्कम जमा केली नाही, तर आपले खाते बंद होते. मात्र अशा बंद राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी 50 रुपयांप्रमाणे, तसेच त्या प्रत्येक वर्षाची वर्गणी 500 रुपये भरून आपण हे खाते पुन्हा सुरू करू शकतो. पण एका वर्षाला कमीत कमी 500 रुपये आजच्या काळात काहीच नाहीत, त्यामुळे दरवर्षी ते भरून अशी वेळ येऊच देऊ नये. या खात्याला नामांकनाची सुविधा उपलब्ध आहे. आपल्याला पीपीएफचे पासबुक दिले जाते, त्यावरच नामांकनाची (नॉमिनेशनची) नोंद केली जाते. केलेले नामांकन नंतर बदलताही येते.
आहे ना ही बहुगुणी योजना? गुंतवणूक करायची की नाही, हा निर्णय मात्र तुमचा.

kuluday@rediffmail.com