आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pulses Production At Record High Yet Prices Are Still Up

कडधान्याचे विक्रमी उत्पादन, डाळींचे भाव मात्र चढेच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जूनअखेर संपलेल्या पीक वर्षामध्ये (2012-13) देशभरात डाळींचे विक्रमी 18.45 दशलक्ष टन उत्पादन झाले आहे, परंतु गेल्या वर्षात काही राज्यांमध्ये पडलेल्या दुष्काळाचा फटका मात्र अन्नधान्याच्या उत्पादनाला बसला असून ते 1.5 टक्क्यांनी घसरून 255.36 दशलक्ष टनांवर आले असल्याचे कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. कडधान्याचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी सर्व डाळींचे भाव मात्र चढेच आहेत.

अगोदरच्या तिसर्‍या अंदाजातील 18 दशलक्ष टनांच्या तुलनेत डाळींच्या उत्पादनात 2012-13 वर्षात विक्रमी 18.45 दशलक्ष टनांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाच्या चौथ्या आगाऊ अंदाजामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. देशातील मागणीच्या तुलनेत साधारणपणे 3 ते 4 दशलक्ष टन डाळींचा तुटवडा जाणवतो. हा तुटवडा भरून काढण्यासाठी आयातीवरच अवलंबून राहावे लागते, परंतु विक्रमी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर डाळ उपलब्ध असून आयातीचे प्रमाण घटेल आणि किमतीदेखील कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. देशात 2012-13 वर्षामध्ये 255.36 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाल्याचा ताजा अंदाज अधिकृत आकडेवारीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

अन्नधान्याचे उत्पादन तिसर्‍या अंदाजाप्रमाणेच असले तरी 2011 - 12 वर्षातल्या जुलै ते जून या पीक हंगामातील विक्रमी 259.29 दशलक्ष टनांच्या तुलनेत मात्र कमी आहे. अन्नधान्याच्या गटामध्ये तांदळाच्या उत्पादनाच्या अंदाजात फेररचना करण्यात आली असून तो अगोदरच्या 104.22 दशलक्ष टनांवरून 104.4 दशलक्ष टनांपर्यंत नेण्यात आला आहे, परंतु 2011 - 12 वर्षात तांदळाचे उत्पादन 105.3 दशलक्ष टनांपेक्षा कमी झाले होते.


दुष्काळाचा फटका
कडधान्याच्या उत्पादनातदेखील फेरबदल केला असून अगोदरच्या 39.52 दशलक्ष टनांच्या तिसर्‍या अंदाजावरून आता ते 40.06 दशलक्ष टनांवर (2012-13) नेण्यात आले आहे, परंतु अगोदरच्या वर्षातल्या 42.01 दशलक्ष टनांच्या तुलनेत हे उत्पादन अद्यापही कमी आहे. गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज मात्र घटवण्यात आला आहे. अगोदरच्या 93.62 दशलक्ष टनांच्या तिसर्‍या अंदाजाच्या तुलनेत ते 92.46 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. 2011 - 12 वर्षात गव्हाचे 94.88 दशलक्ष टन उत्पादन झाले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि राजस्थानमध्ये झालेल्या अपुर्‍या पावसामुळे मागील वर्षाच्या तुलनेत 2012- 13 वर्षात अन्नधान्याचे उत्पादन तुलनेने कमी झाले आहे.