आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक मिलकडून मागणीमुळे बीडमध्ये तुरीच्या दरात तेजी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - स्थानिक डाळ मिलकडून मागणी असल्याने सरत्या आठवड्यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर ठिकाणच्या तुलनेत चांगली तेजी राहिली. त्याचबरोबर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथील बाजारात ज्वारीचे भाव देखील उंच राहिले. नगर तसेच परराज्यातून धान्यांची आवक वाढली आहे.


मागील आठवड्यात ज्वारीची 1050 क्विंटल आवक झाली. 1350 रुपये किमान तर 2205 रुपये कमाल भाव राहिले. सरासरी 1550 रुपये क्विंटल ज्वारीला भाव मिळाला. येथील गावरान ज्वारीचे भाव इतर जिल्ह्यांतील दराच्या तुलनेत तेजीत होते. बाजरीची 740 क्विंटल आवक होती. किमान 1300 तर कमाल 1550 रुपये भाव राहिले. 1450 रुपये सरासरी भाव मिळाला. पशुखाद्यलायक बाजरीला मागणी होती. या बाजरीचे भाव 1200 ते 1300 रुपये क्विंटल होते. तालुक्यातून गव्हाची आवक 248 क्विंटल झाली. 1800 ते 2100 रुपये प्रतिक्विंटल भाव होते. स्थानिक गव्हाला सरासरी 1701 रुपये क्विंटलचा भाव मिळाला, तर नगर,पुणे,मध्य प्रदेश व गुजरातमधून आवक सुरूच आहे. या गव्हाचे भाव 1850 ते 2400 रुपये राहिले. साठवणूक करणा-या घरगुती ग्राहकांकडून चांगली मागणी होती.
बाजारात हरभ-याची केवळ 104 क्विंटल आवक होती. 2200 रुपये तर कमाल 3121 रुपये क्विंटलचा भाव हरभ-याला मिळाला. तुरीची 220 क्विंटल आवक राहिली. किमान 3500 तर कमाल 4600 रुपये क्विंटल दराने तुरीचे व्यवहार झाले. बाजारात अन्नधान्याची एकूण 6 हजार 62 क्विंटल आवक
झाली. ग्राहकी समाधानकारक असल्याचे सूत्रांनी सांगितले.


तूर, ज्वारीत तेजी
मागच्या आठवड्यात तूर व ज्वारीच्या भावात जालना व अन्य बाजारपेठेच्या तुलनेत क्विंटलमागे किमान दीडशे ते दोनशे रुपये व तुरीमध्ये 50 ते 60 रुपये तेजी होती. जिल्ह्यातील इतर बाजारांतही बीडपेक्षा भाव कमी राहिले. किसनराव नाईकवाडे, उपाध्यक्ष, आडत व्यापारी संघटना, बीड.


आंब्यांची आवक सुरू
फळ बाजारात लालबाग, हापूस, दशेरी, बदाम आंध्र, कर्नाटकमधून आंब्यांची आवक सुरू झाली आहे. आगामी आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता आहे. पन्नास ते दीडशे रुपये किलोप्रमाणे दर्जानुसार भाव आहेत. रत्नागिरी हापूसचा भाव डझनाला चारशे ते सहाशे रुपये होता. मुखीद बागवान, फळ व्यापारी.


तुरीला स्थानिक मागणी
बीडच्या मोंढ्यात पांढ-या तुरीची चांगली आवक होती. त्याचबरोबर स्थानिक तिन्ही मिलकडून मागणी होती त्यामुळे चांगला भाव मिळाला. तालुक्यातील वांगी, शिवणी, नवगण राजुरी भागातून तुरीची आवक होती.


हिरवी मिरची भडकली
भाजी बाजारात हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्याने तेजी होती. साठ ते 80 रुपये किलो भाव राहिले, तर आले 70 ते 80 किलो दराने विकले गेले. मेथी, कोथिंबीर, पुदिना, चुका गड्डीचे भाव पाचशे रुपये शेकडा होते. कांदे, बटाट्याचे भाव स्थिर होते. उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक कमी राहिली, परंतु व्यापारही थंडावलेला होता.
समीर बागवान, विक्रेते, बीड.