आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीच्या पावसाने पडझडीला लगाम बसून सेन्सेक्सचा 233 अंकांनी उसळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक शेअर बाजार स्थिरावल्यामुळे भांडवल बाजाराला मोठा दिलासा मिळाला. आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस आणि रिलायन्ससारख्या बड्या समभागांची मूल्याधिष्ठित खरेदी झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पडझडीला लगाम बसून सेन्सेक्सने 233 अंकांची उसळी घेतली. माहिती तंत्रज्ञान आणि बहुराष्‍ट्रीय कंपन्यांच्या समभाग खरेदीची साथदेखील त्याला मिळाली. मुंबई शेअर बाजारात जवळपास 1,250 समभागांची दणकून खरेदी झाल्याने गुंतवणूकदारांची श्रीमंती 52 हजार कोटी रुपयांनी वाढली.


रुपयाचे अवमूल्यन आणि बाजारातून बाहेर जात असलेला भांडवलाचा ओघ यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये 400 अंकांची गटांगळी खाल्ल्यानंतर सकाळी सेन्सेक्स कमाल पातळीवर उघडला आणि दिवसभर तो त्याच पातळीवर राहिला. दिवसभरात माहिती तंत्रज्ञान, बहुराष्‍ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, रिफायनरी आणि गृहोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांनी खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले. परिणामी सेन्सेक्स दिवसअखेर 233.08 अंकांनी वाढून 19,410.84 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातदेखील सुधारणा होऊन तो 66.5 अंकांनी वाढून 5836.95 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एमसीएक्स शेअर बाजारदेखील 152.2 अंकांनी वाढून 1,565.58 अंकांच्या पातळीवर बंद झाला.


अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली सुधारणा झाल्यामुळे वॉलस्ट्रीट शेअर बाजारात तेजीचे वारे आले. युरोपियन सेंट्रल बॅँक आणि बॅँक ऑफ इंग्लंडकडून धोरणात्मक निर्णय होण्याअगोदर युरोप शेअर बाजारात प्रारंभीच्या सत्रात तेजी होती, परंतु येन चलन मजबूत झाल्यामुळे जपान शेअर बाजार घसरला.


टॉप गेनर्स
आयटीसी, टाटा पॉवर, टीसीएस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, गेल इंडिया, रिलायन्स, हिंदाल्को, सन फार्मा


या समभागांनी वेधले लक्ष
भांडवल बाजारात आयटीसीच्या समभागाने प्रामुख्याने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले परिणामी कंपनीच्या समभाग किमतीत 3.74 टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि रुपया सावरल्यामुळे आयटी समभागांवर खरेदीच्या उड्या पडल्यामुळे इन्फोसिस, टीसीएस, विप्रोच्या समभाग किमतीत जवळपास 2 ते 3 टक्क्यांनी वाढ झाली.