क्वाड्रिसायकलला मान्यता, बजाज / क्वाड्रिसायकलला मान्यता, बजाज ऑटोच्या चारचाकीचा मार्ग मोकळा

May 23,2013 09:16:00 AM IST

नवी दिल्ली - क्वाड्रिसायकल या चारचाकी वाहनांच्या नव्या श्रेणीला सरकारने बुधवारी मान्यता दिली. सध्या क्वाड्रिसायकल वाहनांचा वापर केवळ शहरी भागातच करता येईल, असे सरकारने म्हटले आहे.
रस्ते सचिव विजय छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मोटार-वाहने अधिनियमात (सीएमव्हीआर) दुरुस्ती करून क्वाड्रिसायकल या वाहनांच्या अतिरिक्त श्रेणीचे उत्पादन आणि नोंदणीबाबत निर्णय झाला.
क्वाड्रिसायकल या चारचाकी वाहनांच्या नव्या श्रेणीच्या मान्यतेबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केले. यानुसार सीएमव्हीआर कायद्यात दुरुस्ती करून तीनचाकी वाहनांसाठी सध्या असणार्‍या तरतुदीनुसार क्वाड्रिसायकल श्रेणीला मान्यता देण्यात आली आहे. युरोपियन युनियन क्वाड्रिसायकल किंवा सीएमव्हीआर यापैकी ज्या तरतुदी योग्य असतील त्यानुसार ही नवी श्रेणी अस्तित्वात येईल, असे परिवहन मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे.
या वाहनांवर इंग्रजी क्यू हे अक्षर असेल. तसेच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी व्यावसायिक आधारावर क्वाड्रिसायकल वाहनांची नोंदणी करता येईल. केवळ नोंदणीकृत
परवानाधारक चालकाला पालिका क्षेत्रातच क्वाड्रिसायकल वाहने चालवता येतील. सध्या बहुतेक शहरांत असणार्‍या व सार्वजनिक वाहतूक करणार्‍या तीन चाकी वाहनांसाठी क्वाड्रिसायकल हा पर्याय असेल, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्ते सचिवाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अवजड उद्योग मंत्रालय, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीचे (आयकॅट) प्रतिनिधी उपस्थित होते.
क्वाड्रिसायकल काय आहे
क्वाड्रिसायकल हा तीन चाकी आणि चारचाकी वाहनांचा सुवर्णमध्य साधणारा वाहनांचा प्रकार आहे. यात तीनचाकीची सर्व सूत्रे वापरून सुरक्षित कार तयार करण्यात येते. 1890 मध्ये हेन्री फोर्ड यांनी पहिली क्वाड्रिसायकल तयार केली. तिला सायकलचे चार चाक आणि इथेनॉलवर चालणारे इंजिन होते. क्वाड्रिसायकल चारचाकी वाहने तीनचाकी वाहनांपेक्षा सुरक्षित असून त्यांना दरवाजे तसेच छत असते. मात्र, छोट्या कारपेक्षा कमी वेग आणि कमी क्षमतेचे इंजिन क्वाड्रिसायकल वाहनांत असते.

बजाजच्या कारचे औरंगाबादेत उत्पादन

केंद्र सरकारने क्वाड्रिसायकल प्रकारच्या वाहनांच्या व्यापारी उत्पादनाला हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे बजाज आरई-60 या कारच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कंपनीने महिन्याला 5000 कारचे उत्पादन करण्याची योजना आखली आहे. बजाजच्या औरंगाबादजवळील वाळूज येथील कारखान्यात आरई-60 कारचे उत्पादन होणार आहे. बजाज ऑटोच्या वाळूज येथील कारखान्याचे बजाजच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वाचे स्थान आहे. सरकारने क्वाड्रिसायकल श्रेणीला मान्यता दिल्याचे बजाज ऑटो कंपनीने स्वागत केले आहे. भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण दिन असल्याचे मत बजाज ऑटोचे एमडी. राजीव बजाज यांनी व्यक्त केले.

X