आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्विक हिल’ची पुढील वर्षात ‘क्विक’ समभाग विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संगणकाला सुरक्षा कवच देण्यात आघाडीवर असलेली ‘क्विक हिल टेक्नॉलॉजीज’ या सिक्युरिटी सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंपनीने उत्पादनांबरोबरच नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी प्राथमिक बाजारपेठेत पाऊल ठेवण्याची योजना आखली आहे. कंपनी समभाग विक्रीसाठी पुढील आर्थिक वर्षात भांडवल बाजाराचा उंबरठा ओलांडण्याची शक्यता आहे.
हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर तातडीने प्राथमिक समभाग विक्री करण्याची योजना आहे. एप्रिल-मेपर्यंत लेखापरीक्षण पूर्ण केल्यानंतर त्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर यांनी सांगितले.
कंपनीच्या विस्तार योजनेला निधी पुरवठा करण्याच्या उद्देशाने भांडवल बाजारात प्रवेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना काटकर म्हणाले, सर्व प्रकारच्या डिजिटल सुरक्षेसाठी आणखी काही सुरक्षात्मक उत्पादने आणि जागतिक पातळीवर झेप घेण्याचा विचार आहे. डेटा लॉस प्रिव्हेन्शन, मोबाइल डिव्हाइस मॅनेजमेंटसारखी काही उत्पादने बाजारात आणण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आयपीओचे स्वरूप आणि प्रवर्तकांची भागधारणा याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. कंपनीमध्ये प्रवर्तकांचा 90 टक्के मालकी हिस्सा असून सेकोया कॅपिटल व्हेंचर कॅपिटल फंडाचा 10 टक्के हिस्सा असल्याचे त्यांनी सांगितले.

क्विक हिलचे आज देशातील प्रत्येक भागात भक्कम स्थान असून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, इटली, स्पेन या बाजारपेठांमध्येदेखील कंपनीने चांगला शिरकाव केला आहे.