आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक सुधारणा मार्गावर मोदी सरकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सर्व जण एकच प्रश्न एकमेकांना विचारतो आहे की, मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सर्वसामान्यांसाठी चांगले दिवस कधी येणार? मी याआधी उल्लेख केल्याप्रमाणे यासाठी किमान दोन वर्षे तरी लागतील. कारण यापूर्वीच्या यूपीए सरकारने आपल्या चुकीच्या धोरणाद्वारे या अर्थव्यवस्थेवर अनेक भार टाकले आहेत. यात यूपीए सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचाही समावेश आहे. यामुळे सरकारची आर्थिक स्थिती एवढी बिघडली आहे की, विकास आणि गुंतवणूक त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही. यूपीए सरकारने दोन चुकीचे कायदेही बनवले आहेत. पहिला देशातील एकतृतीयांश जनतेसाठी अन्न सुरक्षा कायदा, तर दुसरा भू-संपादन कायदा. या नव्या कायद्यामुळे नवे मोठे पायाभूत प्रकल्प स्थापन करणे जवळजवळ अशक्य होईल. या सर्वांत सुधारणा, दुरुस्ती करण्यासाठी किमान एक वर्ष तरी लागेल आणि येणारे वर्ष हे बदल लागू करण्यासाठी आहे. अशा रीतीने स्पर्धेच्या दिशेने मोठा बदल 2016-17 मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

असे असले तरी ‘अच्छे दिन’चे प्रारंभी रूप चारही दिशांनी दिसण्यास सुरुवात झाली आहे. बिझनेस सेंटिमेटमधील सुधारणा याचे संकेत आहेत. यूपीए आणि एनडीए सरकारमधील नाट्यमय बदल हा वास्तविक अर्थव्यवस्थेत नव्हे, तर लोकांच्या सर्वसाधारण दृष्टिकोनात बदल झाला आहे. नवे सरकार व्यापारविरोधी नसल्याचे लोकांना वाटायला लागले आहे. या विचाराला मोठे महत्त्व आहे. कारण सरकारकडून कोणत्याही धोरणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर व्यापारी आणि उद्योजकांची धारणा गुंतवणूक न करण्याची होईल आणि ते जोखीम उचलणार नाहीत. मात्र, नवे सरकार आल्यापासून अर्थजगतात जोखमीची पावले टाकली जात आहेत.

स्पर्धात्मक सुधारणा पातळी गाठल्यास आणखी सुधारणा दिसून येतील. जूनमध्ये देशातील प्रमुख आठ उद्योगाच्या (कोअर सेक्टर) उत्पादनात 7.3 टक्क्यांनी वाढीची गती पकडली आहे. यात कोळसा, तेल, रिफायनरी उत्पादने, स्टील, खते, वीज, सिमेंट आणि गॅस या सारख्या उद्योगांचा समावेश आहे. या आठ पायाभूत उद्योगांचा देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) 38 टक्के वाटा आहे. समजा हा उद्योग क्षेत्राचा सर्वात मोठा हिस्सा असेल तर बाकी उद्योग मागे कसे राहतील ?

अर्थव्यवस्थेत सुधारणेचे दुसरे लक्षण म्हणजे जुलैमध्ये एचएसबीसी पर्चेजिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) आकडेवारीत झालेली वाढ. उद्योगांच्या खरेदी व्यवस्थापकांनी फॅक्टरी उत्पादनासाठी किती माल खरेदी केला याचे आकलन या निर्देशांकावरून होते. जुलैमध्ये हा निर्देशांक वाढून 53 वर पोहोचला. याचाच अर्थ उद्योगांना नवीन ऑर्डर मिळण्यास सुरुवात झाली असून कारखान्यातून उत्पादन वाढीस गती मिळाली आहे. पीएमआय 50 च्या वर असणे हे त्या देशातील औद्योगिक हालचाली वाढल्याचे द्योतक मानले जाते.

तिसरा संकेत या आठवड्याच्या शेवटी जूनमधील आयआयपी निर्देशांकाचे आकडे जारी झाल्यानंतर मिळणार आहे. हा निर्देशांक सकारात्मक राहण्याची शक्यता जास्त आहे त्याचे संकेत एप्रिल-मेमध्येच मिळाले होते. तेव्हा आयआयपी अनुक्रमे 3.4 आणि 4.7 टक्के दराने वाढले होते. हे आयआयपीच्या बाबतीत सप्टेंबर 2013 नंतरचे सर्वात चांगले आकडे आहेत. त्या वेळी औद्योगिक उत्पादन 2.7 टक्के गतीने वाढले होते. अशा रीतीने आयआयपी आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील सुधारणा देशातील औद्योगिक हालचालींचा वेग वाढल्याचे दर्शवतात.

चौथा संकेत निर्यातवाढीच्या रूपाने दिसून आला. ऑक्टोबर 2013 पासून निर्यातीची गती मंदावली होती. एवढेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी-मार्चमध्ये निर्यात नकारात्मक पातळीत होती. एप्रिलमध्ये 5.3 टक्के वाढीसह निर्यात सकारात्मक पातळीत आली. मे आणि जूनमध्ये निर्यात अनुक्रमे 12.4 आणि 10.2 टक्के गतीने वाढली. देशातील वाहन विक्रीत वाढ झाली आहे. सरकारकडून वाहनांवरील आयात शुल्क कपात करण्यात आल्याने कार आणि मंोटारसायकलींची विक्री वाढली. जुलैमध्ये मारुती सुझुकीच्या कार विक्रीत 20 टक्के आणि होंडाच्या विक्रीत 40 टक्के वाढ झाली आहे. मोटारसायकलच्या बाबतीत होंडा आणि यामाहाच्या विक्रीत अनुक्रमे 33 आणि 36 टक्के गतीने वाढ झाली आहे.

ऑटो सेक्टरमध्ये व्यावसायिक वाहनांबाबत चिंताजनक स्थिती आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लिलँड या क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या विक्रीत घसरणीची माहिती आहे. आयआयपीची आकडेवारी सकारात्मक राहिली तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीची गाडी गती घेऊ शकते. अशा रीतीने भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे प्रारंभिक संकेत मिळत आहेत. त्यामुळे तीन वर्षांत प्रथमच देशाचा जीडीपी पाच टक्क्यांहून जास्त राहण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील दोन वर्षे जीडीपी पाच टक्क्यांहून कमी राहिला आहे. नरेंद्र मोदी यांनी केवळ निवडणूक जिंकून आणि व्यापारी, उद्योजकांत आशावाद वाढवून देशाला विकासाच्या मार्गावर आणले असल्याचे मानले जात आहे.

लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आणि डीएनएचे माजी संपादक आहेत.
- आर. जगन्नाथन