आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीकली इकॉनॉमी: शेअर मार्केटमध्ये का राहणार तेजीचा कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीर्घकाळानंतर आपले शेअर बाजार दरदिवशी नवे विक्रम नोंदवत आहेत. मागील आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 25,000 च्या पार जाऊन 25,396 या विक्रमी उंचीवर बंद झाला. अर्थव्यवस्था मरगळलेली असताना या तेजीबाबत आश्चर्य वाटायला नको का?
शेअर बाजाराबाबत कोणतीच भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही आणि अशी सध्या स्थितीही नाही जी निर्देशांकांचे योग्य मूल्य सांगू शकेल. मात्र, एका दृष्टीने पाहिल्यास एक बाजू असे सांगते की, सध्या आपला बाजार ओव्हरव्हॅल्यूड किंवा वास्तविक किमतीपेक्षा महागलेला नाही. हा अंदाज असा : देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाविरुद्ध (जीडीपी) बाजारातील सर्व समभागांचे एकूण मूल्य (मार्केट कॅपिटलायझेशन). शुक्रवारी भारतीय बाजाराचा एकूण मार्केट कॅप 1.5 लाख कोटी डॉलर (सुमारे 90 लाख कोटी रुपये) होता, तर भारताचा 2013-14 चा जीडीपी जवळपास 1.78 अब्ज डॉलर होता. याचा अर्थ सध्या भारतीय शेअर बाजाराचे मूल्य आमच्या जीडीपीच्या फक्त 84 टक्क्यांएवढेच आहे.

दुसरीकडे, अमेरिकेचा विकास दर भारतापेक्षाही कमी आहे. तोही आर्थिक मंदी असताना. अमेरिकेचा मार्केट कॅप आणि त्यांचा जीडीपी यांचे प्रमाण जवळपास 115 टक्के आहे. म्हणजेच अमेरिकन शेअर बाजाराचे मूल्य त्याच्या जीडीपीपेक्षा 15 टक्के अधिक आहे. आमच्यासाठी 1:1 हे प्रमाण म्हणजे मार्केट कॅप आणि जीडीपी समान असणे चांगलेच म्हटले पाहिजे. म्हणजे ते ओव्हरव्हॅल्यूड अथवा महाग नसणे. सेन्सेक्सच्या सध्याच्या स्तरानुसार पाहिले तर आमच्या शेअर बाजाराचे व्हॅल्युएशन खूपच योग्य म्हणावे लागेल.

जर हे प्रमाण वाढून 1:1 झाले किंवा असे म्हटले की, जीडीपीच्या 100 टक्के एवढे झाले तर सेन्सेक्स 30,000 च्या पातळीवर राहायला हवा. अशा रीतीने आमचा शेअर बाजार सध्याच्या पातळीवर महाग झालेला नाही; पण याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही कोणताही शेअर खरेदी करा आणि भविष्यात पैसा तयार होईल, अशी आशा करा. लक्षात ठेवा, सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी निर्देशांक देशाच्या बड्या कंपन्यांच्या शेअरचे प्रतिनिधित्व करत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी इंडेक्सच्या बाहेरील शेअर खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. योग्य शेअर निवडण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या तज्ज्ञाच्या सल्ल्याची गरज असेल, मग भलेही तो इंडेक्सचा शेअर असो किंवा त्याच्याबाहेरचा.

आगामी काळात शेअर बाजाराच्या निर्देशांकात आणखी वाढ होईल, असे मानले तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी कोणते पर्याय योग्य ठरू शकतील? मी आपल्याला एचडीएफसी, आयसीआयसीआय अथवा यूटीआयसारख्या चांगल्या म्युच्युअल फंडाद्वारे इंडेक्स फंड खरेदी करण्याचा सल्ला देईन. सर्वसामान्यपणे इंडेक्स फंड इंडेक्सएवढेच रिटर्न देतात. त्याचे कारण म्हणजे फंड व्यवस्थापकही इंडेक्समध्ये सहभागी शेअरची खरेदी इंडेक्समधील त्याच्या प्रमाणाएवढेच खरेदी करतात. जर सेन्सेक्स अंडरव्हॅल्यूड असेल अथवा त्याचे मूल्य वास्तविक मूल्यापेक्षा कमी असेल तर तो पुढील वर्षात 30,000 पर्यंत वाढू शकतो. म्हणजे सेन्सेक्स इंडेक्स फंड आपल्याला या कालावधीत 20 टक्के रिटर्न देईल. त्याला चांगले रिटर्न म्हणता येईल, जो महागाईवरही मात करेल.

पण एक इशाराही आहे. बाजार अल्पावधीत कोणत्याही दिशेकडे वळू शकतो. अशात जर तुम्ही जोखीम घेऊ शकत नसाल तर तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करू नये, अगदी इंडेक्स फंडातही नाही. कारण इंडेक्स फंडही शेअर्समध्ये प्रत्यक्षरीत्या गुंतवणूक करतात. शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती अ‍ॅसेट अलोकेशनसह सुरू करावी. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि फक्त 20 रुपयांची जोखीम घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही तुमची एकूण बचतीची (किंवा मासिक बचत) 20 टक्के रक्कम इंडेक्स फंडात अलोकेट करू शकता. उर्वरित रक्कम बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये किंवा बँकेत किंवा इन्कम फंडात टाकू शकता. येथे मला जोखीम या शब्दाचा अर्थ असा म्हणायचा आहे की, जर तुमचे 20 रुपये बाजार घसरल्याने अचानक 10 रुपये झाले तरी तुम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही. आणि जोखीम घेणे याचा अर्थच असा की, तुम्ही मोठा नफा मिळवण्याच्या अपेक्षेने बरेच काही गमावण्यास तयार आहात.

सर्वसाधारणपणे शेअर बाजारात आधी वाढ होते, नंतर तो करेक्ट होतो म्हणजे घसरण होऊन आपल्या खालच्या पातळीचा शोध घेतो. त्यानंतर त्याची वाटचाल पुन्हा तेजीकडे सुरू होते. जर आम्ही सेन्सेक्सची वाटचाल 18,000 ते 20,000 च्या पातळीवरून तेजीने वाढून तो 25,000 पर्यंत पोहोचल्याचे पाहिले आहे तर जुलैत अर्थसंकल्प आल्यानंतर तो 20,000 ते 21,000 पर्यंत पाहण्याचीही तयारी ठेवावी लागेल. जर अर्थसंकल्प चांगला असला आणि ऑक्टोबरपासून आर्थिक घडामोडींचा वेग वाढला तर पुढील वर्षी फेब्रुवारीत अर्थसंकल्प येईपर्यंत सेन्सेक्समध्ये वाढीचा कल कायम राहू शकेल. असेच होईल असे नाही, पण आमच्या शेअर बाजारात सर्वसाधारणपणे सणांच्या हंगामात निश्चित वाढ होते. त्यामुळे गुंतवणूक करा आणि खुश राहा.
- लेखक आर्थिक विभागाचे ज्येष्ठ पत्रकार, ‘फोर्ब्ज इंडिया’चे एडिटर-इन-चीफ आहेत.
(rjagannathan@dainikbhaskargroup.com)