आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raghuram Rajan Appointed New Governor Of Reserve Bank

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचा कार्यकाळ चार सप्टेंबरला समाप्त होत आहे. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी रघुराम राजन हे गव्हर्नरपदाची सूत्रे सांभाळतील. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रघुराम राजन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. रिझर्व्ह बँकेची सूत्रे हाती घेणारे ते 23 वे गव्हर्नर ठरले आहेत. आर्थिक विकासदराने गेल्या दशकभरातील केलेली घसरणीची नोंद आणि रुपयाचे विक्रमी अवमूल्यन अशा सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची नाजूक स्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत डॉ. सुब्बाराव यांनी मुदतवाढ घ्यावी, अशी केंद्र सरकारची इच्छा होती. याअगोदर ऑगस्ट 2011 मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने केंद्र सरकारदेखील सुब्बाराव यांच्याबद्दल अनुकूल होते. परंतु सुब्बाराव यांनी सेवेतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे केंद्र सरकार गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेत होते. 2008 मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती झालेले सुब्बाराव हे सप्टेंबरमध्ये निवृत्त होत आहेत.


आयआयएम-अहमदाबाद आणि आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी असलेल्या रघुराम राजन यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एमआयटी) डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे.


2008च्या मंदीचे अचूक निदान
शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आणि आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या राजन यांची केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये वित्तमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. स्पष्टवक्ता स्वभाव असलेले राजन यांना पंतप्रधानांचे मानद आर्थिक सल्लागार होण्याचादेखील मान मिळाला आहे. विशेष म्हणजे 2008 मध्ये जागतिक आर्थिक पेचप्रसंगाचा अंदाज वर्तवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नियोजन आयोगाच्या वित्तीय क्षेत्रातील सुधारणांबाबतचा अहवाल तयार करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान मिळाले आहे.


जादूची कांडी नाही, पण...
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सध्याची वेळ नक्कीच आव्हानात्मक असली तरी रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार एकत्रितपणे त्याला सामोरे जातील. समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्याकडे काही जादूची कांडी नाही. पण त्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. कारण एकात्मिकता, स्वतंत्रता आणि व्यावसायिकता या त्रिसूत्रीची परंपरा रिझर्व्ह बँकेने नेहमीच जपली आहे. रघुराम राजन.


सर्वांच्या नजरा...
औद्योगिक घसरण, रुपयाचे अवमूल्यन, किंमतवाढ आणि चालू खात्यातील फुगलेली तूट अशा बिकट मार्गाने देशाची अर्थव्यवस्था वाटचाल करत असताना आता यातून मार्ग काढण्यासाठी नवीन गव्हर्नर काय करणार, याकडे सर्वांच्या आशादायी नजरा लागल्या आहेत.


राजन यांच्यासमोरची आव्हाने
० चलन विनिमय बाजारात स्थिरता आणणे.
० अवमूल्यन रोखून रुपयाला बळकटी देणे.
० रुपया मजबूत करतानाच विकासाचा समतोल राखणे.
० बाजारातील खेळत्या भांडवलाच्या कडक उपाययोजना मागे घेणे. त्या दृष्टीने निश्चित योजना आखणे.
० आर्थिक विकासाची चक्रे गतिमान करण्यासाठी व्याजदर कपातीच्या दृष्टीने पावले उचलणे.
० अन्य महागाई सध्या स्वीकारार्ह पातळीत असली तरी किरकोळ महागाईचे चढे प्रमाण खाली आणणे. त्यासाठी नाणेनिधीत्मक उपाययोजना सुलभ करण्याचा प्रयत्न करणे.
० बँक नियामक या नात्याने भांडवल बाजाराचा विश्वास पुन्हा संपादन करणे.