आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghuram Rajan Warns Of Another Global Financial Crisis

व्याजदर कपात केली तरी गृहकर्ज स्वस्त होणार नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरात कितीही कपात केली तरी घर आणि कार खरेदी करणार्‍यांना दिलासा मिळणार नाही. कारण वाढत्या महागाईने व्यापारी बँकांचे हात बांधलेले आहेत, त्यांना व्याजदर कपात करता येणार नाही. महागाई थोडीफार कमी झाली असली तरी ती अजून उच्च पातळीतच आहे, ती पूर्णपणे नियंत्रणात आल्यासच काही प्रमाणात स्वस्त कर्जाचा दिलासा मिळू शकतो अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांनी महागाईचा विळखा वर्णन केला.

राजन यांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या महागाईचे असे चित्र असले तरी रिझर्व्ह बँकेने आगामी पाच वर्षांसाठीची कार्य योजना निश्चित केली आहे. त्या अंतर्गत वैधानिक रोखता प्रमाणासह (एसएलआर) अनेक अडसर दूर करायचे आहेत. प्राथमिक क्षेत्रांसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ बनवण्यात येत आहे. नचिकेत मोर समितीकडे लक्ष वेधतानाच आर्थिक व्यवस्थेत करण्यात येणार्‍या बदलांना मौद्रिक चक्राच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही.

रिझर्व्ह बँकेशी झालेल्या चर्चांवेळी बँकांनी नेहमीच एसएलआर आणि सीआरआर (राखीव निधी प्रमाण) सारख्या अडथळ्यांवर आक्षेप नोंदवला आहे. भांडवलासाठी राखीव निधीचे प्रमाण सध्या 4 टक्के तर एसएलआर 22 टक्के आहे. सीआरआर जमा रकमांवर बँकांना कसल्याही स्वरूपाचे व्याज मिळत नाही. सीआरआर आणि एसएलआरची मर्यादा पूर्ण केल्यानंतरच उर्वरित रक्कम बँकांना कर्ज वितरणासाठी उपलब्ध राहते. रिझर्व्ह बँकेने मंगळवारच्या पतधोरणात एसएलआरमध्ये अर्धा टक्का कपात केली होती. याचा परिणाम तत्काळ दिसणार नसल्याचे राजन म्हणाले.

रोख्यांतील एफआयआय मर्यादा रद्द नाही
सरकारी कर्जरोख्यांतील विदेशी गुंतवणुकीची (एफआयआय) मर्यादा रद्द करण्याचा विचार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय रोखे बाजारात समावेशासाठी भारत असे पाऊल टाकणार नसल्याचे राजन यांनी स्पष्ट केले. जगातील बहुतेक इंडेक्सनी भारताने एफआयआयची मर्यादा रद्द करण्याची अट ठेवली आहे. राजन यांनी सांगितले, जोपर्यंत विकसित देशातील आर्थिक मदतीचे पॅकेज आणि व्याजदरातील वाढीचा परिणाम आजमावत नाहीत तोपर्यंत ही मर्यादा रद्द करता येणार नाही.