आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रघुरामन राजन योग्य वेळी निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेपुढे जी आव्हाने आ वासून उभी आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी रघुरामन यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरणार आहे. प्रामुख्याने त्यांचा विकसनशील देशांचा अभ्यास आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचे ते कट्टर समर्थक असले तरी काही प्रमाणात बंधने आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. वित्तीय बाजारपेठांचे महत्त्व त्यांनी आपल्या निबंधात विशद केले आहे.
वित्त मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी अर्थतज्ज्ञ रघुरामन राजन यांची झालेली निवड अतिशय योग्य वेळीच आहे, असे म्हणावे लागेल. योग्य वेळी याच अर्थाने की, सध्या जग आणि त्याचबरोबर आपणही एका मोठ्या आर्थिक संकटातून वाटचाल करीत आहोत. अशा वेळी अर्थ मंत्रालयाला आर्थिक पातळीवर जागतिक दृष्टिकोन असलेल्या एक जाणकार सल्लागाराची गरज होती. यापूर्वीचे आर्थिक सल्लागार कौशिक बासू हेदेखील नामवंत अर्थ सल्लागार म्हणून ख्यातकीर्त होते, परंतु त्यांनी मध्यंतरी आवश्यक नसताना भारतीय अर्थव्यवस्थेविषयी निराशाजनक उद््गार काढले होते. त्यांना यामुळे जावे लागणार हे उघडच होते. 49 वर्षीय रघुरामन राजन हे 2008 पासून पंतप्रधानांचे मानद सल्लागार होतेच, परंतु आता त्यांची भूमिका अधिक व्यापक स्वरूपाची असेल.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे 3 फेब्रुवारी 1963 मध्ये जन्मलेले रघुरामन यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. दिल्लीतील आयआयटीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यावर 1987 मध्ये त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथे व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी एमआयटीमध्ये बँकिंग विषयातील पीएचडी घेतली. त्यानंतर त्यांनी युनिर्व्हसिटी आॅफ शिकागो येथील स्कूल आॅफ बिझनेसमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. 2005 मध्ये त्यांनी जागतिक बँकेत सादर केलेल्या ‘वित्तीय विकास आणि जागतिक धोके’ या निबंधावर बरीच चर्चा झाली. त्यांच्या या निबंधानंतर ते जागतिक अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चेत आले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत त्यांचा समावेश एक अभ्यासू अर्थतज्ज्ञ म्हणून झाला.
2003 मध्ये त्यांनी अमेरिकन फायनान्स असोसिएशनचा पुरस्कार लाभला. 2007 मध्ये झालेल्या अमेरिकेतील मंदीच्या लाटेचे त्यांनी आपल्या एका निबंधात वर्णन केले होते, परंतु त्यांनी सादर केलेल्या या निबंधावर अमेरिकेत मोठी टीका झाली. राजन यांचा निबंध नकारात्मक आहे, यातून अमेरिकेचे चुकीचे चित्रण रंगवण्यात आले आहे, अशी टीका झाली. राजन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 2004 मध्ये लिहिलेले ‘सेव्हिंग कॅपिटॅलिझम फ्रॉम कॅपिटॅलिस्ट’ हे त्यांचे पुस्तक गाजले होते.
सध्याच्या कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेपुढे जी आव्हाने आ वासून उभी आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी रघुरामन यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरणार आहे. प्रामुख्याने त्यांचा विकसनशील देशांचा अभ्यास आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचे ते कट्टर समर्थक असले तरी काही प्रमाणात बंधने आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.
वित्तीय बाजारपेठांचे महत्त्व त्यांनी आपल्या निबंधात विशद केले आहे. यात त्यांनी बांगलादेशातील बांबू विणणारा गरीब ते अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक यांची अर्थपुरवठा न झाल्याने कशी कुतरओढ होते याचे त्यांनी उत्तम उदाहरण देऊन आपली मते मांडली आहेत. असे हे नवीन पिढीतील, तरुण सल्लागार आपल्या देशाला लाभले आहेत. त्यांच्या सल्ल्याचा देशाला मोठा उपयोग होईल यात काहीच शंका नाही.