आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajan Affect On Sensex, Not Hope To Cut Interest Rate

राजन यांच्या गुगलीने सेन्सेक्सचा त्रिफळा, व्याजदर कपातीच्या आशा धूसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाढत्या महागाईने व्याजदर कपातीच्या आशा धूसर असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले. त्यामुळे गेले चार दिवस तेजीत असलेल्या शेअर बाजाराला मोठा धक्का बसला. शुक्रवारी गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेन्सेक्स 240 अंकांनी तर निफ्टी 79 अंकांनी आपटला. तिकडे विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरने रुपयाची धुलाई केल्याने रुपयाचे मूल्य दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरले.
राजन यांचे वक्तव्य आणि जागतिक स्तरावरील नकारात्मक कल, चीनच्या मॅन्युफॅक्चरिंग आकडेवारीत आलेली घट यामुळेही गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. विक्रीचा मारा एवढा होता की इंट्रा डे व्यवहारात एकदाही सेन्सेक्स ग्रीन झोनमध्ये दिसला नाही. मागील चार दिवसांत सेन्सेक्सने 310 अंकांची कमाई केली होती. शुक्रवारी मात्र एकाच सत्रात सेन्सेक्स 240.10 अंकांनी घसरून 21,133.56 वर आला. निफ्टी 78.90 अंकांच्या घसरणीसह 6266.75 वर स्थिरावला. आशियातील प्रमुख शेअर बाजारात घसरण दिसून आली. युरोपातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.
विक्रीचा वार : व्याजदर कपातीच्या आशा धूसर, सेन्सेक्स 240 अंकांनी, रुपया 73 पैशांनी घसरला
काय म्हणाले राजन
गुरुवारी डॉ. रघुराम राजन यांचे आर. एन. राव स्मृतिव्याख्यानमालेत भाषण झाले. त्यावेळी ते म्हणाले, महागाई हा घातक रोग असून वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेचे हात बांधलेले असून व्याजदर वाढवणे हाच त्यावर उपाय आहे. रिझर्व्ह बँक 28 जानेवारी रोजी पतधोरणाचा आढावा सादर करणार आहे.
रुपयाचे अवमूल्यन
आयातदार आणि बँकांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याचा फटका शुक्रवारी रुपयाला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 73 पैशांनी घसरून 62.66 वर आले. रुपयाचा हा दोन महिन्यांचा नीचांक आहे. महिना अखेर असल्याने डॉलरला चांगली मागणी असल्याचे निरीक्षण ब्रोकर्सनी नोंदवले.
सोने-चांदी चकाकले
नवी दिल्ली २ लग्नसराईमुळे सोन्याला चांगली मागणी आल्याचा फायदा शुक्रवारी सोन्याला झाला. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 200 रुपयांनी वाढून 30,370 झाले. चांदी किलोमागे 500 रुपयांनी चकाकून 45,000 वर पोहोचली.
घसरलेले समभाग : भेल, टाटा स्टील, टाटा मोटर्स, सेसा स्टरलाइट, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, सिप्ला, सन फार्मा.
राजन इफेक्ट
दोन दिवस विक्रम नोंदवणा-या सेन्सेक्सला राजन यांच्या भाष्याने धक्का बसला त्यामुळे बाजारात घसरण दिसून आली. - जिग्नेश चौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेस