आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - केंद्रीय सांख्यिकी संघटनेने व्यक्त केलेल्या वृद्धी दराच्या अंदाजाबाबत आपण असमाधानी असल्याचे मत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राजीव गांधी इक्विटी स्कीम योजनेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. विकासदर पाच टक्के राहील, असा अंदाज दोन दिवसांपूर्वीच सांख्यिकीने व्यक्त केला होता. अर्थव्यवस्थेतील या महत्त्वाच्या आकडेवारीने उद्योग जगतात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सांख्यिकीने नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा आधार घेऊन हा अंदाज बांधला; परंतु अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणांच्या संकेतांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करून अर्थमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षात विकासदर 5.5 टक्के, तर पुढील आर्थिक वर्षात तो 6.7 टक्क्यांपर्यंत जाण्याचा ठाम विश्वास या वेळी बोलताना व्यक्त केला.
आर्थिक विकासदरातील 5 टक्के वाढीबद्दल संख्यिकीने व्यक्त केलेला अंदाज हा चिंताजनक असल्याचे सांगून चिदंबरम पुढे
म्हणाले की, आर्थिक विकासदराने 2000-01 (4.3 टक्के) आणि 2002-03 (4 टक्के) अशी दोन विक्रमी घसरणीची वर्षे अनुभवली आहेत; परंतु त्यानंतर आर्थिक विकासदरात चांगली वाढ होऊन सरासरी 8 टक्के वाढ कायम राखली आहे; परंतु अर्थव्यवस्था आता पुन्हा उभारी घेत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला लागलेली उतरण थांबेल आणि पुढील वर्षात 6 ते 7 टक्के आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये पुन्हा 7 ते 8 टक्क्यांपर्यंत विकासदर भरारी घेईल, असा विश्वास चिंदरबरम यांनी व्यक्त केला. एमसीएक्स शेअर बाजाराच्या उद्घाटन समारंभातही त्यांनी याचा पुनरुच्चार केला.
शेअर बाजारातील गैरकारभाराला आळा घाला - किरकोळ गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी शेअर बाजारातील गैरकारभाराल आळा घालावा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. ते म्हणाले, शेअर बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे. इन्सायडर ट्रेडिंगसारखे गैरव्यवहार वेळीच थांबवणे आवश्यक आहे. तरच किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे अधिक संख्येने वळतील. वित्तसंस्थांनी उत्पादने किचकट न ठेवता ती अधिकाधिक सोपी, साधी व सुटसुटीत ठेवावीत. त्यामुळे संभ्रम राहणार नाही आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दुणावेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.