आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात वाढली, तूट आवरेना; सोने आयातीत दुपटीने वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कच्चे तेल व सोन्याच्या घटलेल्या किमतीमुळे चालू खात्यातील तुटीने दिलेला दिलासा अल्पजीवी ठरला आहे. एप्रिल महिन्यात सोन्याची आयात तब्बल 138 टक्क्यांनी वाढल्यामुळे चालू खात्यातील तूट पुन्हा एकदा सरकारची चिंता वाढवणार आहे. एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतींनी आपटी खाल्ल्यानंतर या मौल्यवान धातूची मागणी जोरदार वाढल्याने या महिन्यात सोन्याच्या आयातीत दुपटीने वाढ झाली आहे.

सलग चार महिने निर्यातीने चढता आलेख कायम राखला आहे. एप्रिल महिन्यात निर्यात 1.68 टक्क्यांनी वाढून 24.16 अब्ज डॉलरवर गेली आहे.पण सोन्याची आयात दुपटीने वाढल्यामुळे व्यापार तूट मात्र आणखी वाढली आहे. सोन्याची आयात या कालावधीत 138 टक्क्यांनी वाढून ती गेल्या वर्षातल्या एप्रिल महिन्यातील 3.1 अब्ज डॉलरवरून 7.5 अब्ज डॉलरवर गेली आहे. केंद्रीय वाणिज्य सचिव एस. आर. राव म्हणाले, वाढती वित्तीय तूट चिंतेचा विषय असून ती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने सरकार पावले उचलेल.

जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीमुळे मागणी कमी झाल्याने गेल्या आर्थिक वर्षात निर्यात 1.6 टक्क्यांनी घसरून ती 300.6 अब्ज डॉलवर आली होती. याच कालावधीत आयात 0.44 टक्क्यांनी वाढून ती 489.31 अब्ज डॉलरवरून 491.48 अब्ज डॉलरवर आली. परिणामी या काळात व्यापार तूट 190.91 अब्ज डॉलर नोंद झाली.

हिरे आणि दागिने, तांदूळ, तयार कपडे, सूत, सागरी उत्पादनांमुळे निर्यातीत प्रामुख्याने वाढ झाली. परंतु निर्यात वस्तूंमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर असलेल्या अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत मात्र 8.6 टक्क्यांनी घट झाली आहे. धातू आणि भंगार, लाकूड आणि लाकूड उत्पादने, ऑरगॅनिक आणि बिगर ऑरगॅनिक रसायने आदीमुळे एप्रिल महिन्यात
आयात 10.96 टक्क्यांनी वाढून 41.95 अब्ज डॉलरवर गेली आहे.

सोन्याच्या आयातीत बँकांना बंदी
भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी देशातील बँकांना सोन्याची आयात करण्यावर बंदी लादली आहे. सोन्याची मागणी कमी करावी म्हणून बँकांकडून सोन्याची आयात मर्यादित करण्याच निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले. बँका आता फक्त सुवर्णालंकार निर्यातकांच्या गरजेसाठीच सोन्याची आयात करू शकतील.

सोने 180 ने स्वस्त
येथील बाजारपेठेत सोमवारी सोने 180 रुपयांनी स्वस्त होत 27,520 रुपये प्रतितोळ्याने विकले गेले. दागिन्याचे सोने 25,227 रुपये प्रतितोळा होते. अक्षय्य तृतीयेनिमित्त सोन्याची विक्री 40 टक्क्यांनी वाढण्याची आशा ज्वेलर्सनी व्यक्त केली आहे.