मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर डॉ. रघुराम राजन त्यांच्या वाढदिवशी व्याजकपातीची भेट देतील या अपेक्षा मंगळवारी फोल ठरल्या. आरबीआयने प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवत एसएलआरमध्ये ०.५० टक्के कपात केली. आगामी काळातील आर्थिक आकडेवारी पाहून रेपो दरातील कपात ठरवण्यात येईल. मात्र व्यापारी बँकांनी
आपले कर्ज स्वस्त करावे, असे आवाहन या वेळी राजन यांनी केले. महिनाअखेरीस सादर होणार्या अर्थसंकल्पावर रिझर्व्ह बँकेची नजर आहे.
रिझर्व्ह बँकेच्या जैसे थे धोरणामुळे उद्योग, वाहन, बांधकाम व बँकिंग क्षेत्रात नाराजीचे सूर उमटले. शेअर बाजाराने घसरणीद्वारे आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने स्थिर रोखता प्रमाण (स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो - एसएलआर) ०.५० टक्क्यांनी घटवून २१.५ टक्क्यांवर आणला. नवे दर ७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
एसएलआर कपातीमुळे ४५ हजार कोटी येणार : व्यापारी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवण्याच्या रोख रकमेचे प्रमाण अर्थात एसएलआरमध्ये ०.५० टक्के कपात केल्याने अर्थव्यवस्थेत ४५,०००० कोटी रुपयांची रोख रक्कम येईल. त्यामुळे व्यापारी बँकांना कर्ज देणे व स्वस्त करण्यास वाव मिळणार आहे.
आकडेवारीवर नजर
पतधोरण जाहीर करताना व्याजदर जैसे थे ठेवण्याची कारणेही राजन यांनी स्पष्ट केली. रिझर्व्ह बँकेला महागाई, चालू खात्यातील तसेच वित्तीय तूट, जीडीपीची आकडेवारी पाहून मग योग्य ते पाऊल टाकावे लागेल, असे राजन म्हणाले.
उद्योग जगतातून अपेक्षाभंगाचे सूर
रिझर्व्ह बँकेची नजर आता इतर आर्थिक आकडेवारीवर आहे. तसेच काही दिवसांवर आलेल्या अर्थसंकल्पावरही बरेच काही अवलंबून आहे. अर्थसंकल्पानंतर रेपो दरातील कपातीचे चक्र सुरू होईल असे वाटते. - ज्योत्स्ना सुरी, अध्यक्ष, फिक्की
- सीआयआयचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले, जर पाव टक्का कपात झाली असती तर दिलासा मिळाला असता. एप्रिलच्या धोरणात बँक व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा आहे.
पुढे वाचा, आरबीआयच्या द्वैमासिक धोरण आढाव्यातील ठळक बाबी...
बर्थडे बॉय रघुराम राजन बँकांवर नाराज...