आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Steps To Control Rupee May Prove Negative For Banks

रुपयाच्या उपाययोजना बँकांच्या पत दर्जाच्या दृष्टीने नकारात्मक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सातत्याने घसरत असलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी त्या बॅँकांच्या पतदर्जासाठी मात्र नकारात्मक ठरत असल्याचे मत ‘मुडीज’ या जागतिक पतमानांकन संस्थेने व्यक्त केले आहे.

सतत घसरगुंडी करीत अवमूलनाचा नीचांक गाठल्यानंतर रुपयाला सावरण्यासाठी रोकड सुलभतेची स्थिती कडक करण्यासारख्या काही ठोस उपाययोजना रिझर्व्ह बॅँकेने मागील आठवड्यात केल्या. आंतरबॅँक बाजारपेठेतील दर तसेच सरकारी रोख्यांमधील मिळकतीमध्ये झालेल्या नाट्यमय वाढीचा मनी मार्केटवर मात्र परिणाम झाला आहे.

रिझर्व्ह बॅँकेच्या उपाययोजना देशातील बॅँकांच्या पतदर्जाच्या दृष्टीने नकारात्मक ठरत असून आंतरबॅँकेतील दरवाढ जर कायम राहिली तर त्याचा आर्थिक वाढीवर नकारात्मक परिणाम होईल. पर्यायाने बॅँकांच्या मत्तादर्जा आणि मिळकतीवर नकारात्मक ताण येण्याची शक्यता आहे, परंतु उच्च दर कायम राहिल्यास बॅँकांच्या निधी खर्चात जास्त वाढ होण्याची भीती मुडीजने व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बॅँकेने मागील आठवड्यामध्ये बॅँकांच्या कर्जदरात वाढ करण्याचे जाहीर केले. परिणामी खुल्या बाजारातील कामकाज प्रणालीच्या माध्यमातून 12 हजार कोटी रुपयांचा निधी बाजारातून बाहेर गेला. चलन दराला बळकटी देण्याच्या दृष्टीने अल्प मुदतीच्या कालावधीत खेळत्या भांडवलाचे प्रमाण कमी करून अतिरिक्त खेळते भांडवल बाजारातून काढून घेणे यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्याचे मुडीजने म्हटले आहे.

बाजारातील खेळत्या भांडवलाचे हे सध्याचे कडक धोरण असेच कायम राहिले, तर त्याचा बॅँकांच्या निधीवर विपरीत परिणाम होण्याची श्क्यता आहे. विशेष करून ज्या बॅँका घाऊक निधी पुरवठ्यावर जास्त अवलंबून आहेत त्यांची पंचाईत होणार असून वाढत्या निधीचा हा भार ग्राहकांच्या खांद्यावर येण्याची शक्यता असल्याकडे मुडीजने लक्ष वेधले आहे.

जर हा उच्च दर एक ते दोन महिने कायम राहिला तर त्याचा बॅँकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेष करून येस बॅँक, आयडीबीआय बॅँक या घाऊक निधीवर जास्त अवलंबून असल्याचे मुडीजने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या या उपाययोजना सध्याच्या आर्थिक वातावरणात अधिकच आव्हानात्मक ठरत असून त्याचा बॅँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असेही मुडीजने स्पष्ट केले.