आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिमाही पतधोरणाचा आज आढावा; कर्ज स्वस्त होणार की...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रमुख महागाईत झालेली घट, आर्थिक वृद्धीचा मंदावलेला वेग या गोष्टी लक्षात घेता मंगळवारी जाहीर होणा-या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर पाव टक्क्याने कमी करण्याचा अंदाज जागतिक पातळीवरील आघाडीच्या बॅँक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी झाले तरी नाणेनिधी धोरणाच्या मार्गदर्शक रोख मात्र फारसा बदलणार नाही, उलट तो काहीसा ‘सावध’ असेल, अशी शक्यतादेखील या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एचएसबीसी, स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी ग्रुप, बार्कलेज, क्रेडिट सूस या जागतिक पातळीवरील आघाडीच्या बँकांनी रिझर्व्ह बँक मंगळवारी अल्प मुदतीच्या व्याजदरात कपात करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2013 च्या वित्तीय तुटीच्या लक्ष्यानुसार फेब्रुवारीत कमी झालेली व्यापार तूट, खुंटलेली आर्थिक वृद्धी, एप्रिल 2010 नंतर पहिल्यांदाच 4 टक्क्यांपर्यंत घसरलेला मुख्य महागाईचा दर आदी गोष्टींमुळे व्याजदर कपातीसाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. महागाईचा ताण आणि चालू खात्यातील तूट जास्त असल्याने व्याजदर कपातीची संधी आहे.

व्याजदर कमी होतील- घाऊक किमतीवर आधारित महागाईमध्ये अपेक्षेपेक्षा झालेली वाढ, प्रशासकीय इंधनाच्या किमतीत झालेली वाढ, मुख्य महागाईत सातत्याने होत असलेली घसरण यामुळे व्याजदर कमी करण्याचा आणखी एकदा मार्ग मोकळा झाला आहे. - लीफ एस्कसेन, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी.


महागाई दर जास्त- फेब्रुवारीमध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर 6.84 टक्क्यांवर आलेला असला तरी तो अद्यापही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी होऊन तो पुढील आठवड्यात 7.50 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.- अनुभूती सहाय, अर्थतज्ज्ञ, स्टँडर्ड चार्टर्ड.

महागाई कमी होईल- एलपीजी आणि डिझेलमध्ये झालेल्या वाढीची अंमलबजावणी न झाल्यास घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 6.3 टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. - सिद्धार्थ सन्याल, अर्थतज्ज्ञ, बार्कलेज कॅपिटल.

पाव टक्का कपात होईल- मंगळवारी पतधोरण आढाव्यात व्याजदरात पाव टक्क्याने कपात होऊन या वर्षात अर्धा टक्क्याने कपात होण्याचा कयास आहे.- रोहिणी मल्कानी, मुख्य अर्थतज्ज्ञ, सिटी इंडिया.