आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rbi\'s Quater Monatary Policy , Two Pleasurable Changes

आरबीआयचा तिमाही आढावा, दोन सुखद बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तिस-या तिमाहीअखेरचा सन 2012-13 आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा आढावा रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने केला. ते करताना वातावरणात उत्साह आणणारे दोन सुखद बदल केले. एक म्हणजे रेपो रेट 0.25 ने कमी करून 7.75 टक्क्यांवर आणला व दुसरे म्हणजे रोख राखीव प्रमाण (सीआर) 0.25 टक्क्याने कमी करून 4 टक्क्यांवर आणले आहे. गेल्या दीड वर्षापासून, उद्योग क्षेत्र, नोकरदार, कर्जदारांना ज्याची अपेक्षा होती ते बॅँकेने करायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ बॅँकेला आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दिशेने थोडीशी सुरुवात झाली, असे वाटत आहे.

महागाई (चलनवाढ) रोखण्यास प्राधान्य
बॅँकेने हे स्पष्ट केले आहे की, चलनवाढ (महागाईवाढ) दर ठोक किंमत निर्देशांक मार्चअखेर 7.5 टक्के एवढा खाली येण्याची अपेक्षा होती, पण आता हा दर 6.8 टक्के इतका खाली येण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वाढ (जीडीपी) मात्र 5.8 टक्के होईल असे वाटत होते. मात्र तो मार्चअखेरीपर्यंत 5.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. बॅँक आर्थिक वाढीला जरूर महत्त्व देते, पण त्याहून अधिक महत्त्व महागाई (चलनवाढ) रोखण्यास देते, हे बॅँकेने नेहमीच स्पष्ट केले आहे. तरीपण थोडी अनुकूलता वाटायला लागताच, आर्थिक वाढीस चालना देणारे उपाय करण्यास बॅँक तत्पर आहे. हे बॅँकेने आता दाखवून दिले आहे. तथापि अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू यांचा नियमित पुरेसा पुरवठा कमी पडला तर चलनवाढ दरवाढीचा पुन्हा इशारा बॅँकेने दिला आहेच. त्याच वेळी शहरी व ग्रामीण ग्राहक किंमतवाढ निर्देशांक 10.6 टक्क्यांवर असल्याची चिंता व्यक्त केली आहे. निर्यात फारशी वाढत नाही व त्यामुळे आयात-निर्यात व्यापार तफावत करंट अकाउंट डेफिसिट 5.4 टक्क्यांवर होण्याची काळजी व्यक्त करताना, आर्थिक तूट वाढली की, कॅड वाढ व त्यातून खासगी गुंतवणुकीवर परिणाम होऊन आर्थिक वाढीचा दर वाढण्यात अडचणी येतील, असा इशारा दिला आहे.

उद्योगाला दिलासा, 18 हजार कोटी रुपये कर्ज देण्यासाठी उपलब्ध
कर्जावरचे व्याजदर बॅँका कमी करतील, एका बाजूला रेपो रेट कमी झालाय, तर दुस-या बाजूला बॅँकांकडे सीआरआर उतरल्याने वाढीव 18 हजार कोटी कर्ज देण्यास उपलब्ध झाले आहेत. यातून गुंतवणूक व त्यातून उत्पादनास व रोजगार वाढीस चालना मिळेल आणि आर्थिक वाढीचा दर वाढण्यास मदत होईल.

कमी व्याजदरात गृहकर्जाची उपलब्धता
मध्यमवर्गीयांना गृहकर्जाची उपलब्धता व तीही तुलनेने कमी केलेल्या व्याजदराने वाढेल. कर्जाचे हप्ते दरमहाचे कमी झाले की ताण कमी होऊन गृहकर्जाची मागणी व त्यातून गृहबांधणी उद्योगवृद्धी होईल. गेल्या काही दिवसांत थेट परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा व कराच्या बाबतीत गार (सर्वसाधारण करचुकवेगिरीला आळा-नियम) पुढे ढकलणे, यामुळे गुंतवणूक व उत्पादनवाढीच्या आशा-अपेक्षा उंचावल्या आहेत.

महागाई उतरून आपल्यासारख्यांना दिलासा मिळण्याचे दिवस येत आहेत असे वाटावे इतके हे सारे आहे. चांगलेच आहे, पण दुष्काळाच्या झळा वाढल्या आहेत, अशा वेळी रब्बी पीक उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त कमी झाले तर महागाईला आवरणे कठीण होईल.

त्यात, ग्रामीण भागात विशेषत: कृषी क्षेत्राला कर्जपुरवठा पुरेसा होत नाही व तो करणे बॅँकांना, सहकारी बॅँकांना विशेषत: अवघड झाले आहे. यातून कमी उत्पादन, कमी पुरवठा, वाढते धान्यदर होण्याची शक्यता आहे. पण त्याला तोंड देऊन वाढती आर्थिक वाढ व कमी महागाईवाढ होईल, अशी आशा पतधोरणाने निर्माण केली आहे.