आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरकॉम-एरिक्सन अब्जाचा करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोबाइल नेटवर्कमध्ये आणखी सुधारणा तसेच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्सने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासगी क्षेत्रातील कंपनीने आपल्या उत्तर आणि पश्चिम भारतातल्या नेटवर्कचे कामकाज आणि व्यवस्थापनाचे आऊटसोर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने मोबाइल क्षेत्रातल्या एरिक्सन या जाणकार कंपनीबरोबर जवळपास एक अब्ज डॉलर्सचा आणि आठ वर्षे मुदतीचा नेटवर्क व्यवस्थापन करार केला आहे.
जागतिक दर्जाची सेवा आणि कामगिरीसाठी वायरलाइन आणि वायलेस नेटवर्क क्षेत्रातील एखाद्या कंपनीने केलेला हा पहिलाच असा करार असल्याचे आरकॉमच्या एंटरप्राइज व्यवसाय विभागाचे मुख्य कामकाज अधिकारी पुनीत गर्ग यांनी संगितले.


रिलायन्स कम्युनिकेशन्सने दिलेल्या या कंत्राटामध्ये एक लाख किलोमीटर्स फायबर जाळे तसेच दिल्ली आणि मुंबईसह संपूर्ण उत्तर आणि पश्चिम भारतातल्या आरकॉमच्या 11 दूरसंचार मंडलांतील मोबाइल इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जवळपास एक अब्ज डॉलर्सचे मूल्य असलेल्या या कंत्राटाचा कालावधी आठ वर्षांचा असून या कामासाठी आरकॉमचे पाच हजारपेक्षा जास्त कर्मचारी एरिक्सन कंपनीमध्ये रुजू होणार आहेत. तंत्रज्ञान आणि अ‍ॅप्लिकेशनमुळे नेटवर्कमधील कामाची गुंतागुंत अधिक वाढली आहे.

सेवेची जबाबदारी एरिक्सनवर
या भागीदारीमुळे रिलायन्स आपला प्रमुख व्यवसाय तसेच नावीन्यतेवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स कम्युनिकेशन्सचे जवळपास 5 हजारपेक्षा जास्त कर्मचारी कंपनीमध्ये सहभागी होणार असल्याचे एरिक्सनचे कार्यकारी उपाध्यक्ष मॅग्नस मँडरसन यांनी सांगितले. देशातील सहा लाख खेडी आणि 24 हजार शहरांमध्ये आरकॉमचे जाळे विस्तारले असून या सर्व भागांमध्ये व्हॉइस, डेटा,व्हिडिओ सेवा दिल्या जातात. सेवा देण्याची जबाबदारी एरिक्सनवर असेल.