आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - सुताच्या वाढत्या किमतीचा परिणाम तयार कपड्यांच्या (गारमेंट) निर्यातीबरोबरच आता देशातील बाजारपेठांतही दिसू लागला आहे. देशातील तयार कपड्यांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गारमेंट निर्मात्यांच्या मते, सुताच्या सतत वाढणा-या किमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे तयार कपड्यांच्या किमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय नाही.
क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएमएआय) पदाधिका-यांच्या मते, गेल्या 20 ते 25 दिवसांत सुताच्या किमतीत किलोमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. सीएमएआयचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी सांगितले, सुताच्या किमती वाढत असल्याने बजेटमध्ये वस्त्रोद्योगाला मिळालेल्या शुल्क सवलतीचा लाभ ग्राहकांपर्यत पोहोचण्यात अडचणी येणार आहेत. सूत महागल्याने गारमेंटच्या किमती किती रुपयांनी वाढतील हे सध्या सांगणे कठीण असले तरी गारमेंट महागणार हे मात्र निश्चित आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षी गारमेंटला फारशी मागणी नव्हती. बजेटमध्ये उत्पादन शुल्कात सवलत मिळाल्याने उलाढाल वाढण्याची शक्यता होती. मात्र, सुताच्या किमतीचा आलेख सतत उंचावत आहे. त्यामुळे गारमेंटच्या किमती वाढवणे अपरिहार्य आहे. किमती वाढल्यामुळे
गारमेंटच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गारमेंटच्या किमती मुख्यत: फॅब्रिकवर ठरतात. फॅब्रिक उत्पादकांनी किंमतवाढीचे संकेत दिले आहेत. कॉटन काउंटीचे उपाध्यक्ष डी. बन्ना यांनी सांगितले, गारमेंट उत्पादनाच्या खर्चात 15 टक्के वाढ झाली आहे. दोन महिन्यांनंतर गारमेंट बाजारावर याचा परिणाम दिसून येईल. गारमेंटच्या किमती 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गांधीनगर येथील गारमेंट निर्माते अंजनी आहुजा म्हणाले, गारमेंटची निर्मिती फॅब्रिकशी संबंधित आहे, तर फॅब्रिकचा संबंध आहे यार्नशी (सूत). त्यामुळे सुताच्या किमती वाढल्याचा परिणाम गारमेंटच्या किंमतवाढीवर होईल. गारमेंटच्या किमती कमीत कमी वाढून मागणीवर त्याचा परिणाम होणार नाही, याचा मेळ आता बसवावा लागणार आहे.
गारमेंट निर्मात्यांची अडचण
सुताच्या सतत वाढणा-या किमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
हा भार हलका करण्यासाठी गारमेंटच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही.
सीएमएआयचे मत
गेल्या 20 ते 25 दिवसांत सुताच्या किमतीत किलोमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे.
सुताच्या किमती वाढत असल्याने बजेटमध्ये वस्त्रोद्योगाला मिळालेल्या शुल्क सवलतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येणार आहेत.
किंमत वाढणार
सुताच्या किमती वाढल्याने फॅब्रिक बाजारात तेजी येते.
त्यानंतर हळूहळू गारमेंटच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.