आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recession Disappear From India, Booming Come Mood's Estimation

भारतातील मंदी सरणार, तेजी येणार; मुडीजचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाच्या अर्थव्यवस्थेवरील मंदीचे काळे ढग दूर झाले असली तरी विकासदर पुढील वर्षातच अपेक्षित पातळी गाठणार असून यंदाच्या आर्थिक वर्षात तो पाच ते साडेपाच टक्क्यांपर्यंत आणि 2015 मध्ये तो सहा टक्क्यांच्याही वर जाईल, असा अंदाज मुडीजच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकांनंतर व्यावसायिक आत्मविश्वास उंचावून अर्थव्यवस्थेला ख-या अर्थाने गती मिळेल. स्थिरावलेला रुपया आणि नियंत्रणात आलेली चालू खात्यातील तूट या दोन मुख्य जोखमींनंतर विकासदर स्थिरावला असल्याचे मुडीजने म्हटले आहे.
जीडीपीची वाढ अपेक्षित पातळीपर्यंत झालेली नसली तरी अलीकडच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था स्थिरावली असून जोखमीचे प्रमाण कमी झाले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या रोखे खरेदी कार्यक्रमामुळे मागील वर्षात रुपया जितका संवेदनशील झाला होता, आता तो तितका नाही. या वर्षात अर्थव्यवस्थेत हळुवार सुधारणा होणार असली तरी 2015 पर्यंत ती अपेक्षित पातळीवर येणार नाही, असे मुडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे. निर्यातीमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून त्याची सुरुवात मागील वर्षाच्या मध्यापासून सुरू झाली आहे जवळपास 30 महिन्यांनंतर विकासदराचा चढता आलेख सुरू झाला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे वाईट दिवस संपले असून निर्यातवाढीमुळे चालू खात्यातील तूट नियंत्रणात आणण्यासाठी मदत झाली आहे.
बीएनपी परिबासचा अंदाज 5.1 टक्क्यांचा
० बीएनपी परिबास या बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन विभागाने मात्र यंदाच्या वित्तीय वर्षात आर्थिक विकासदरात 4.3 टक्क्यांनी वाढ होईल. त्यानंतर आर्थिक वाढ वेग घेत आर्थिक वर्ष 2015 मध्ये तो 5.1 टक्क्यांवर जाईल, असे मत व्यक्त केले आहे.
० महागाई कमी झाल्याने या वर्षाच्या दुस-या सहामाहीत काही प्रमाणात व्याजदर कमी होतील; परंतु पुढील दोन तिमाहीत व्याजदराचे प्रमाण चढे राहतील, असेही बीएनपी परिबासने अहवालात म्हटले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत वित्तीय तूट 5.3 टक्क्यांपर्यंत फुगलेली असली तरी चालू खात्यातील तूट सकारात्मक पातळीवर आहे. ती आर्थिक वर्ष 2014 मध्ये 2.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
तूर्त घसरण, पुढील वर्षात सुधारणा : क्रिसिल
चालू खात्यातील वाढलेली तूट तसेच अन्य कारणांचा विचार करता क्रिसिल या पतमानांकन संस्थेने मात्र चालू आर्थिक वर्षात विकासदर 4.8 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे; परंतु सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता कृषी क्षेत्रामुळे विकासदराला गती मिळण्याची अपेक्षा क्रिसिलने व्यक्त केला आहे. या अगोदर क्रिसिलने 2013 - 14 वर्षात विकासदरात 5.5 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. महसूल वाढ फारशी न झाल्याने सरकारने 4.8 टक्के वित्तीय तुटीचा व्यक्त केलेला अंदाज अति असून ती यंदाच्या आर्थिक वर्षात 5.2 टक्के राहील, असे म्हटले आहे. चांगला पाऊस झाल्याने कृषी क्षेत्राकडून जीडीपी 5.2 टक्क्यांर्पंत वाढण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच एकट्या कृषी क्षेत्राची यंदाच्या वर्षात 4.5 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज क्रिसिलच्या व्यवस्थापकीय संचालक रूपा कुडवा यांनी व्यक्त केला. कृषी क्षेत्राची वाढ मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.