आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदी, महागाईमुळे नवीन नोकरभरतीचे चित्र धूसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोलमडलेली जागतिक अर्थव्यवस्था आणि महागाईचा वाढता दबाव यांचा देशातील कंपन्यांनादेखील मोठा फटका बसू लागला आहे. परिणामी या कंपन्यांनी आता कर्मचारी भरतीबाबत सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नौकरी.कॉम या संकेतस्थळाने एक हजारपेक्षा जास्त कंपन्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात हा कल दिसून आला आहे. गेल्या वर्षी 80 टक्के कंपन्यांनी नवीन नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु यंदाच्या वर्षात केवळ 62 टक्के कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत नोकर्‍यांच्या संधी निर्माण होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
अर्थव्यवस्थेची गती कमी होऊ लागल्यामुळे नोकर्‍या देण्याचे प्रमाणही कमी कमी होऊ लागले आहे. एकूणच नोकर्‍यांच्या परिस्थितीचे प्रमाण कमी झाले आहे. कुशल आणि हुशार कर्मचारी आजही कार्यरत असले तरी त्यांचा शोध घेणे व त्यांना टिकवून ठेवणे हे कंपन्यांच्या दृष्टीने आव्हान ठरू लागले असल्याचे मत ‘इन्फो एज’चे मुख्य वित्त अधिकारी अंबरीश रघुवंशी यांनी व्यक्त केले.
विविध क्षेत्रांतील नोकर्‍या देण्याचे प्रमाण तपासून बघण्यासाठी दरवर्षी दोन वेळा हे सर्वेक्षण केले जाते. बाजारातील नोकर्‍यांच्या सद्य:स्थितीवर प्रकाशझोत टाकून पगारवाढ, नोकर्‍यांच्या संधी आणि नोकरी बदलण्याचे प्रमाण यावर सर्वेक्षणाचा भर असतो. हे सहामाही ई-मेल सर्वेक्षण असून ते नौकरी.कॉमच्या नोंदणीकृत ग्राहकांना पाठवले जाते. सांख्यिकी आणि विेषणात्मक तंत्राचा वापर करून हा अहवाल तयार केला जातो.
नोकर्‍या बदलणे कंपन्यांसाठी डोकेदुखी : अर्थव्यवस्थेचा वेग कमी असल्यामुळे आणि नवीन संधी कमी होऊ लागल्यामुळे कर्मचारी नोकर्‍या बदलताना विचार करू लागले आहेत. कर्मचार्‍यांचे नोकर्‍या बदलणे ही डोकेदुखी ठरली असून त्याला कंपन्यांनी त्याला दुजोरा दिला आहे. आपापल्या संस्थेत हे प्रमाण 10 टक्क्यांहूनही कमी झाल्याचे जवळपास 60 टक्के कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
पगारवाढीचे प्रमाण अपेक्षेप्रमाणेच - कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना 2012 मध्ये दिलेल्या पगारवाढीचाही आढावा या अहवालात घेण्यात आला. सुमारे 40 टक्के कंपन्यांच्या मते हे प्रमाण 10 ते 15 टक्के होते आणि 26 टक्के लोकांच्या मते पगारवाढीचे प्रमाण 5 आणि 10 टक्क्यांच्या दरम्यान होते. वर्षाच्या सुरुवातीला कंपन्यांनी वर्तवलेल्या भाकिताप्रमाणेच हे झाले.
हुशार कर्मचार्‍यांची चणचण - हुशार कर्मचार्‍यांना असलेली मागणी आणि त्यांची उपलब्धता यातील पोकळी वाढत चालल्याबद्दलही कंपन्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या 72 टक्के कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये हा प्रश्न मोठाच वाढला असल्याचे मत व्यक्त केले. तर 44 टक्के जणांनी टॅलेंट क्रंचचा सर्वाधिक फटका हा 4-8 वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचार्‍यांना बसल्याचे सांगितले.