आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदी महाराष्‍ट्राच्या दारात; ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिक वस्तू व्यवसायात घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाची घसरण एकीकडे सुरू असतानाच आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच उद्योग क्षेत्रामध्येही घसरण होत आहे. राज्यातील ऑटोमोबाइल, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रिकल वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, अन्न प्रक्रिया व्यवसाय या काही प्रमुख व्यवसायांना मंदीचा फटका बसला असून हे उद्योग गेल्या वर्षीच्या तुलनेत तोट्यात आहेत, ते सावरणे उद्योग विभागापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काही वरिष्ठ अधिका-यांकडे यासंबंधात उद्योग विभागाने एक सादरीकरण केले. तसेच राज्यातील उद्योगांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा झाली.


राज्यातील विविध उद्योगांत गेल्या तीन महिन्यांच्या उलाढालीत घट झाली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात 1.74 टक्के घट, बांधकाम साहित्यात 12 टक्के, इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये 4.72 टक्के, अभियांत्रिकी वस्तू व्यवसायात 11.19 टक्के, अन्न प्रक्रिया उत्पादनात 5.49 टक्के घट झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे उद्योग विभागाचे म्हणणे आहे. याबाबतचे सविस्तर सादरीकरण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून काही उद्योगांना आणखी सवलती द्याव्यात, अशी मागणी उद्योग विभागाने वित्त विभागाकडे केली आहे. विशेषत: ऑटोमोबाइल व्यवसायातील उलाढालीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आलेली घट ही राज्यासाठी नकारात्मक मानली जात असून या क्षेत्राला मदत करण्यासाठी उद्योग विभागाचा विशेष प्रयत्न राहणार असल्याचे समजते.


जगभर मंदीचे वातावरण असताना त्याचा परिणाम देशावर आणि पर्यायाने राज्यातील गुंतवणुकीवरही झाला आहे. त्यातच रुपयाच्या होणा-या घसरणीमुळेही काही क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यता आहे. तरीही आतापर्यंत उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक झाल्याचे दिसते. मात्र, त्यामुळे बेसावध न राहता आतापासूनच पावले उचलणे गरजेचे असल्याचे उद्योग विभागाला वाटते, असे त्या अधिका-याने सांगितले. त्यासाठी ठरावीक निधीची मागणी करण्याऐवजी जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सवलती, करात सूट अशा काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे उद्योग विभागातर्फे या बैठकीत सांगण्यात आले. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने विरोधकांकडून, माध्यमांमधून सरकारवर सातत्याने होणारी टीका ही नवीन उद्योगांसाठी पोषक नाही, असेही मत या बैठकीमध्ये नोंदवण्यात आले. इतरही काही राज्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करू पाहत असताना महाराष्ट्राने उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत उद्योग विभागाने या बैठकीत नोंदवले.


वित्त विभागाची माहिती उद्योग विभागाकडे...
याच सादरीकरणामध्ये राज्याचा महसूल अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे जेमतेम प्राप्त होईल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली असून डिसेंबर 2013 आणि मार्च 2014 मध्ये 4,000 कोटी रुपयांनी खर्च वाढणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकूणच जमाखर्चामध्ये ताळमेळ घालण्यासाठी खर्चामध्ये अपरिहार्य बचत करावी लागेल, अशीही सूचना उद्योग विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, अर्थसंकल्पीय अंदाज उद्योग विभागाकडून कसा काय व्यक्त होऊ शकतो याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्योग विभागाकडून माहिती कशी आली, अशी चर्चा आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक उलाढाल
क्षेत्र 2012-13 (एप्रिल ते जून) 2013-14 (एप्रिल ते जून)
ऑटोमोबाइल 33,253 कोटी रु. 32,675 कोटी रु.
बांधकाम साहित्य 8,152 कोटी रु. 7,171 कोटी रु.
इलेक्ट्रिक वस्तू 10,112 कोटी रु. 9,635 कोटी रु.
अभियांत्रिकी वस्तू 12,575 कोटी रु. 11,168 कोटी रु.
अन्न प्रक्रिया उत्पादने 8,257 कोटी रु. 7,804 कोटी रु.