आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीचे विघ्न हटणार, निर्यातीने घेतली भरारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्याच्या आर्थिक मंदीच्या वातावरणात सुवार्ता मिळणे तसे कठीणच. पण गेल्या एक-दोन दिवसांमध्ये मात्र एकामागून एक असे सुखद धक्के मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्यात निर्यातीने गेल्या दोन वर्षात घेतलेली भरारी, व्यापार तुटीने 11 अब्ज डॉलरची गेल्या चार महिन्यांतील गाठलेला नीचांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तब्बल नऊ महिन्यांनंतर पुन्हा एकदा मोटार विक्रीने टाकलेला टॉप गिअर या सर्व सुखकर घटना म्हणजे अर्थव्यवस्थेला नव्याने मिळालेल्या उभारीचे संकेतच असल्याचे मानले जात आहे.


सध्याच्या आर्थिक मरगळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या सकारात्मक घडामोडींमुळे सेन्सेक्सही 727 अंकांची भरारी घेत 20 हजार अंकांच्या पातळीवर गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून अवमूल्यनाने सळो की पळो करून सोडलेला रुपयादेखील डॉलरच्या तुलनेत जवळपास 140 पैशांनी सशक्त होऊन 63.84 च्या भक्कम पातळीवर गेला. चार सलग सत्रांत स्थानिक चलन 379 पैशांनी भक्कम झाले आहे हे विशेष.


जागतिक स्तरावरील सुधारलेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून देशातील निर्यातदेखील 13 टक्क्यांनी वाढून ऑगस्ट महिन्यात 26.14 अब्ज डॉलरवर गेली. पण त्यातही आयात 0.68 टक्क्यांनी घटून 37 अब्ज डॉलरवर आली. सोन्याची आयात अगोदरच्या महिन्यातील 2.2 अब्ज डॉलरवरून ऑगस्ट महिन्यात ती केवळ 0.65 अब्ज डॉलरची झाली. सोन्याची आयात घटल्यामुळेच आयात कमी होण्यास मोठी मदत झाली. हे चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर सुरू असलेल्या धडपडीला मिळालेले यश आहे असे म्हणता येईल. फक्त 17.88 टक्क्यांनी वाढून 15.1 अब्ज डॉलरवर गेलेली तेल आयात ही थोडीशी गालबोट लावणारी गोष्ट म्हणता येईल.
देशातील निर्यातीने सलग दुस-या महिन्यात नोंदवलेली वाढ, सोन्याच्या आयातीमध्ये झालेली घट यामुळे व्यापार तूट कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. गेल्या महिन्यात निर्यातीमध्ये 12.97 टक्क्यांनी वाढ होऊन ती 26.14 अब्ज डॉलरवर गेली आहे. आयात 0.68 टक्क्यांनी कमी होऊन ती 37.05 अब्ज डॉलरवर आली.


व्यापार तूट अगोदरच्या वर्षातल्या ऑगस्ट महिन्यातील 14.7 अब्ज डॉलरवरून यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 10.9 अब्ज डॉलरवर आली आहे. सोन्याच्या आयातीतही लक्षणीय घट होऊन ती जुलै महिन्यातील 2.2 अब्ज डॉलरवरून 0.65 अब्ज डॉलरवर आली आहे. पारंपरिक आणि नवीन बाजारपेठेतील मागणीत सुधारणा होत असल्याने निर्यात वेग घेऊ लागली. गेल्या काही महिन्यांतील मरगळ झटकणा-या या सकारात्मक घडामोडी अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणा-या असल्याचे द्योतक आहेत.


सकारात्मक घडामोडी
केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर युरोप आणि अमेरिकेतील आर्थिक वातावरणात झालेली सुधारणादेखील महत्त्वपूर्ण आहे. ब्रिटनसह अन्य काही बड्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थिरता येत असल्याचे संकेत आणि अमेरिकेतील वाढती मागणी या सकारात्मक घडामोडी असल्याचे मत केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी व्यक्त केले.


वाहन बाजारात तेजी
वाहन बाजारानेदेखील ऑगस्ट महिन्यात मरगळ झटकली. गेल्या नऊ महिन्यांपासून वाहन बाजारातील उतरणीला अखेर ब्रेक लागून मोटारींची विक्री जवळपास 15.37 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षातल्या याच महिन्यातील 1, 15,705 मोटारींवरून 1,33,486 मोटारींवर गेली आहे. विक्रीमुळे वाहन बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असले तरी गेल्या वर्षात मारुतीच्या मानेसार प्रकल्पात महिनाभर झालेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ‘लो बेस इफेक्ट’ही वाढ झालेली असल्याचे मत वाहन बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बाजारातील सध्याच्या वातावरणाचा अंदाज घेता मोटार विक्रीत वाढ झाल्याचे आढळून येत नाही.