आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसी विक्रीचा पारा वाढला, वातानुकूलन कंपन्या सुखावल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उन्हाच्या काहिलीने त्रस्त केलेले असले तरी एलजी, सॅमसंग इंडिया, हेअर, व्हर्लपूलसारख्या कंपन्या मात्र जबरदस्त विक्रीच्या वाढीमुळे सुखावल्या आहेत.केवळ मोठी शहरेच नाही, तर लहान शहरांमधून मागणी वाढल्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात वातानुकूलन उपकरण विक्रीत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षाच्या उन्हाळ्यात वातानुकूलन उपकरण उद्योगाने एक दशलक्ष विक्रीची नोंद केली होती. यंदा ही विक्री 1.2 दशलक्षापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

एलजी इंडियाच्या वातानुकूलन उपकरण विभागाचे व्यवसायप्रमुख सौरभ बैसाखिया यांनी सांगितले की, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रीच्या दृष्टीने चांगले वर्ष आहे. वातानुकूलन उपकरणांच्या विक्रीत सरासरी 20 टक्के वाढ झाली आहे. एलजी इंडियाच्या विक्रीत 50 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. सॅमसंग इंडियाच्या ग्राहक वस्तू विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश कृष्णन यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने बाजारात आणलेला नवीन स्प्लिट एसी व ग्राहकांची खरेदीची सकारात्मक मानसिकता यामुळे यंदा आमच्या स्प्लिट एसीने 30 टक्के विक्री वाढीची नोंद केली आहे.

हेअर अप्लायन्सेसने गेल्या वर्षी 66 हजार एअर कंडिशनर्सची विक्री केली होती, परंतु यंदा जानेवारी ते मे या कालावधीत ही विक्री 70 हजारांवर जाण्याची शक्यता कंपनीचे अध्यक्ष एरिक ब्रगँझा यांनी व्यक्त केली. महागाई आणि चलन बाजारात चढ - उताराची स्थिती असतानादेखील मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा विक्रीसाठी सुसह्य ठरल्याचे व्हर्लपूल इंडियाच्या कंपनी व्यवहार विभागाचे उपाध्यक्ष शंतनू दासगुप्ता यांनी सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किमती 10 टक्के वाढूनदेखील विक्रीवाढ चांगली असल्याकडे बैसाखिया यांनी लक्ष वेधले.

छोट्या शहरांमध्ये खरेदीचा कल वाढला
मोठ्या शहरांशिवाय लहान शहरांमध्ये खरेदीचा कल वाढला आहे. मार्च ते मे या कालावधीत द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील बाजारपेठेत वातानुकूल उपकरणांच्या विक्रीचा वेग वाढलेला दिसून येतो. त्यामुळे या उपकरणांसाठी भविष्यात याच बाजारपेठा महत्त्वाच्या ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खरेदी यादीत एसी तिसर्‍या क्रमांकावर

उत्पन्नात झालेली वाढ आणि खर्च करण्याची तयारी या दोन गोष्टींमुळे दहा वर्षांपूर्वी चैनीची वस्तू म्हणून गणल्या जाणार्‍या एअर कंडिशन आता ग्राहकांच्या खरेदीच्या यादीत टीव्ही, फ्रिजनंतर तिसर्‍या स्थानावर आहे.