आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेफुसोल इन्‍व्‍हर्टर' कंपनीने उभारला पुण्‍यात प्रकल्‍प

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देशातील विद्यापिठांची संख्या ६१३, एक कोटी १४ लाख विद्यार्थी, पुण्याला जर्मनीतून येण्यास थेट विमान सेवा, इंग्रजी भाषा आकलन आणि वापर करणारे वाढते मनुष्यबळ, पुण्यात वेगाने विस्तारलेला वाहन उद्योग, कमी खर्चात सुटे भाग पुरविणारे छोटे उद्योजक आणि गॅजेट्सशिवाय जगू न शकणारी नवी पिढी. या सर्व बलस्थानाचा विचार करून इन्व्हर्टर उत्पादन करणारी जर्मनीतील आघाडीची कंपनी रेफुसोल इंडियाने १२ कोटी रुपये गुंतवणूक करून पुण्याजवळ नगर रस्त्यावर लोणीकंद येथे प्रकल्प उभारला आहे.

भारताची बाजारपेठ अद्याप विकसित झालेली नसल्याने दक्षिण आशिया, पश्चिम आशियासह जगातील बाजारपेठेत येथून निर्यात केली जाणार आहे, असे कंपनीचे मुख्याधिकारी थॉमस विटेक यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. सौर इलेक्ट्रॉनिक्स तंत्र वापरून इन्व्हर्टर विकसित करण्यासाठी जागतिक संशोधन आणि विकास केंद्रही पुण्यात स्थापन केल्याचे त्‍यांनी नमूद केले. ते म्हणाले की, उत्पादन प्रकल्प फेब्रुवारीत सुरु झाला आहे. सध्या ९० टक्के आयात कच्च्या मालाचा वापर केला जात असलातरी २०१३ अखेर ५० टक्के भारतीय सुटे भाग वापरले जातील. वर्षाला १५ हजार युनिट तयार करण्याची सध्या क्षमता असून ती आगामी तीन वर्षात वाढविली जाईल. त्यासाठी आणखी ३० कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत.

निर्यातीची प्रचंड क्षमता असल्याने परकी चलन भारताला मिळवून देण्यात आमचा मोठा हातभार लागेल अशी माहिती देऊन ते म्हणाले की, १०, १३, १७, २० आणि २३ किलोवाट क्षमतेचे स्ट्रिंग इन्व्हर्टर आम्ही येथे बनवीत आहोत. भारताची बाजारपेठ २०३० पर्यंत ४५० टक्के वाढलेली असेल आणि त्याचा फायदा आम्हाला मिळेल.

धूळ, थंडी, उंचावरील प्रदेश हे युरोपातील अडथळे भारतात नाहीत आणि वर्षातून आठ महिने सूर्यप्रकाश असल्याने येथील प्रकल्प भांडवली खर्च पाहता नक्कीच फायद्याचा ठरणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.