आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Industry Investment In Petrochemical And Retail

रिलायन्स जिओमध्ये वर्षभरात मिळणार सात हजार जणांना नोकर्‍या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - खासगी क्षेत्रातील अग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील तीन वर्षांच्या कालावधीत पेट्रोरसायन, तेल आणि वायू त्याचप्रमाणे रिटेल व दूरसंचार क्षेत्रात 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे.
रिलायन्सच्या इतिहासातील हा सर्वात मोठा गुंतवणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना ही माहिती दिली.

तेल आणि वायू संशोधन- उत्खननापासून ते रिफायनरी, मार्केटिंग, पेट्रोरसायन, रिटेल, ब्रॉडबँड, डिजिटल सर्व्हिसेस अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करतानाच अंबानी यांनी जगातील पाच अव्वल पेट्रोरसायन उत्पादकांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य गाठण्याचा मनोदय व्यक्त केला. सध्या वर्षाला 15 दशलक्ष टन असलेली पेट्रोरसायनांची उत्पादन क्षमता 25 दशलक्षांपर्यंत विस्तारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मुकेश अंबानी यांनी मागील वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चार ते पाच वर्षांच्या कालावधीत 1,00,00 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आता ही गुंतवणूक वाढवून तीन वर्षांत दीड लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ब्रिटनमधील बीपी या कंपनीबरोबर झालेल्या भागिदारीची अपेक्षित फळे मिळण्यास सुरुवात झाली असून अलीकडेच रिलायन्सला कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील डी 6 क्षेत्रात 2 किलोमीटर खाली लक्षणीय वायू साठा सापडला. आता लवकरच वायू उत्पादनाला कंपनी सुरुवात करणार आहे.

रोजगार वाढणार
दूरसंचार व्यवसायातील कर्मचारी मनुष्यबळात वाढ करून ते सध्याच्या 3 हजारांवरून वर्षभरात 10 हजारांपर्यंत नेण्याचा मानस अंबानी यांनी व्यक्त केलेला असला तरी दूरसंचार सेवा सुरू करण्याबाबतच्या पथदर्शी आराखड्याबाबत माहिती दिली नाही. रिलायन्स जिओ इन्फोकॉम या एकमेव कंपनीला फोरजी ब्रॉडबँडसाठी राष्ट्रीय पातळीवरचा परवाना मिळाला आहे, परंतु अद्याप या कंपनीने व्यावसायिक कामकाजाला प्रारंभ केलेला नाही.

छायाचित्र - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेला उपस्थित अंबानी कुटुंबीय. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी, कोकिलाबेन, नीता अंबानी, ईशा व आकाश अंबानी.