आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सशी ‘फेसबुक फ्रेंड’ भागीदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झांबिया, टांझानिया, केनिया, घाना आणि कोलंबियानंतर फेसबुकची ‘इंटरनेट डॉट ओआरजी सेवा’ आता भारतात उपलब्ध झाली आहे. इंटरनेट जगताची सफर आपल्या ग्राहकांना अधिक सुलभ व्हावी यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्सने या सेवेसाठी ‘फेसबुक’शी भागीदारी केली आहे. त्यामुळे रिलायन्सच्या ग्राहकांना जवळपास ३३ वेबसाइटची मुशाफिरी ‘चकटफू’ करता येऊ शकणार आहे.

‘फेसबुक’बरोबरच्या भागीदारीमुळे केवळ इंटरनेटचाच प्रसार वाढणार नाही, तर शिक्षण, माहिती, व्यापार क्षेत्रांशी ग्राहक ऑनलाइन जोडले जातील, असे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे मुख्य अधिकारी गुरदीप सिंग यांनी सांगितले. फेसबुकच्या ‘इंटरनेट.ओआरजी’चे उपाध्यक्ष ख्रिस डॅनियल्स यांनी देशातील प्रत्येकाला इंटरनेटशी जोडण्यातील हा एक मूलभूत टप्पा असून त्यामुळे नागरिकांना नवनवीन माहिती मिळेल, गोष्टी शिकता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

इंटरनेट ओआरजी काय आहे? इंटरनेट प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इंटरनेट.ओआरजी’ हा फेसबुकने राबवलेला उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही डेटा चार्ज आकारणीशिवाय ‘२ जी’, ‘३ जी’ इंटरनेट वापरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाच्या वेबसाइट व सुविधा उपलब्ध करून देते.

सेवा कशी मिळवाल
ऑपेरा मिनी मोबाइल वेब ब्राऊझरचा वापर करून इंटरनेट.ओआरजी संकेतस्थळावर जाता येते. त्यासाठी अँड्रॉइड अॅप यूसी ब्राऊझरची मदत घ्यावी लागेल; पण ही सेवा कोणत्याही विशिष्ट हँडसेट, स्क्रीनचा आकार किंवा ऑपरेटिंग प्रणालीपुरती मर्यादित नसून फीचर फोन ग्राहकांनादेखील या सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल.

या वेबसाइटवर करा ‘चकटफू’ सर्फिंग
*करिअर व नोकरी : टाइम्स जॉब बाबा जॉब
*शिक्षण, ज्ञान : विकिपीडिया, विकीहाऊ, डिक्शनरी.कॉम, ट्रान्सलेटर, रॉयटर, मार्केट लाइट. जागरण जोश
*आरोग्य, समाजकल्याण: फॅक्ट्स फॉर लाइफ (युनिसेफ), बेबी सेंटर अँड मामा, गर्ल इफेक्ट (नायके फाउंडेशन), आय लर्न (यूएन वुमन), मलेरिया नो मोर, सोशल ब्लड, एपी स्पिक्स.
*बातम्या : डेली भास्कर, बीबीसी न्यूज, टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, एनडीटीव्ही, आयबीएन लाइव्ह, आज तक, अमर उजाला.कॉम, मलाई मलार, जागरण, न्यूजहंट आदी.

सेवा या शहरांना
मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, चेन्नई, तामिळनाडू, केरळ व टप्प्याटप्प्याने उर्वरित शहरांत ही सुविधा सुरू करून कालांतराने इतर वेबसाइट आणि सुविधांचा समावेश.
* या भाषेत मिळणार सेवा : मराठी, इंग्रजी, हिंदी, तामीळ, तेलगू, मल्याळम, गुजराती.