आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Repo And Revers Cuts Zero Effect On Automobile Industry

रेपो आणि रिव्हर्स रेपो दरातील कपातीने वाहन उद्योगावर शून्य परिणाम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - रेपो आणि रिव्हर्स रेपो दरातील कपातीमुळे वाहन उद्योगातील मागणीवर फारसा काही परिणाम होणार नसल्याचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. परंतु तरीही सध्याच्या वाहन बाजारातील मरगळलेल्या वातावरणात पाव टक्का कपातही नसे थोडकी, अशी भावना या उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वाहन उद्योगासाठी ही नक्कीच सकारात्मक घडामोड असून बाजारालादेखील यामुळे सकारात्मक संदेश मिळणार आहे. परंतु तरीही व्याजदरात झालेली कपात ही अत्यल्प आहे. परंतु व्याजदर कमी झाल्यामुळे ग्राहकांची मानसिकता उंचावण्यास मदत होईल, असे मत ‘सोसायटी ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (सियाम) चे अध्यक्ष एस. शांडिल्य यांनी व्यक्त केले आहे. मारुती सुझुकी इंडियाने रिझर्व्ह बॅँकेचे पतधोरण योग्य दिशेने जाणारे असल्याचे स्पष्ट करतानाच व्याजदर कपात पुरेसी नसल्याचे मत कंपनीचे सीओओ मयंक पारीख यांनी व्यक्त केले. महिंद्रा अ‍ॅँड महिंद्राच्या वाहन विभागाचे अध्यक्ष पवन गोएंका म्हणाले की, यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रमुख क्षेत्रांमधील गुंतवणुकीला पुनरुज्जीवन मिळेल.

आणखी व्याजदर कपात आवश्यक
जनरल मोटर्स इंडियाचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांच्या मते, कर्जाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने वाहन उद्योगाला व्याजदरात किमान अर्धा टक्क्याने कपात होण्याची अपेक्षा होती. पण केवळ पाव टक्का व्याज कमी झाल्यामुळे वाहन बाजारातील मागणीला लगेचच बळकटी मिळेल असे आपणास वाटत नाही. परंतु एकूणच अर्थव्यवस्थेवर असलेला ताण लक्षात घेता छोटी कपातही महत्त्वाची आहे. तरीही अर्थसंकल्पापर्यंत तरी वाहन बाजार टर्न अराउंड होईल असे आपणास वाटत नाही. येणा-या दिवसांमध्ये आणखी व्याजदर कपात होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.